प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्याकांडाला (Sidhu Moose Wala Murder) सध्या एक वेगळं वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. सिद्धूची हत्या होऊन बरेच दिवस झाले. मात्र, अद्यापही या हत्याकांडाचा छडा लागलेला नाही. यामध्येच सध्या दररोज या प्रकरणी नवीन खुलासे होत असून आता या हत्याकांडाचा घटनाक्रम एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धू मूसेवालावर हल्ला करणारे संशयित हल्लेखोर सोनीपत येथील असून प्रियवत फौजी आणि अंकिस सेरसा अशी त्यांची नावं आहेत. या दोघांना पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद करण्यात आलं
फतेहाबादमधील बीसला गावात असलेल्या एका पेट्रोल पंपावर दिल्लीची नंबर प्लेट असलेली एक गाडी पेट्रोल भरण्यासाठी आली होती. या गाडीमध्ये प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा असल्याचं या सीसीटीव्हीत पाहायला मिळालं.
पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना प्रियवत व अंकित गाडीतून खालती उतरले होते. प्रियवत हा सराईत शार्प शुटर असून १८ मार्च २०२१ रोजी सोनीपतमध्ये गॅगस्टर बिट्टू बरोणा याच्या वडिलांच्या झालेल्या हत्याकांडात त्याचा सहभाग होता.
दरम्यान, प्रियवतच्या क्राइम हिस्ट्रीप्रमाणे अंकितची कोणतीही हिस्ट्री पोलिसांकडे नाही. सध्या सिद्धू मूसेवाला हत्याकांडा प्रकरणी अनेकांकडे बोट ठेवलं जात आहे. काही दिवसांपूर्वी लॉरेंस बिश्नोई आणि कॅनडात असलेल्या गोल्डी बरार यांनी सिद्धूची हत्या केल्याचं म्हटलं जात होतं. गोल्डी बरारने सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येची जबाबदारीही घेतली होती. परंतु, आता सीसीटीव्हीमध्ये प्रियवत व अंकित यांचा चेहरा समोर आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.