सुप्रसिद्ध दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची ५८ वर्षीय आई चरण कौर यांनी मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे. दिवंगत गायकाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून त्यांच्या घरातील नवीन पाहुण्याच्या आगमनाविषयीच्या बातमी चाहत्यांसोबत शेअरे कली. त्यांनी नुकत्याच जन्मलेल्या मुलाला आपल्या हातात धरून फोटो काढला आहे. या फोटोमध्ये त्यांच्या दिवंगत मोठ्या मुलाचा म्हणजेच सिद्धू मुसेवालाचा फोटोदेखील आहे. आता यातच आणखी एक व्हि़डीओ सोशल मीडियावर समोर आला.
सुकशिंदर शिंदा या व्यक्तीनं बलकौर सिंग आणि नवजात बाळाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्कीच भावूक व्हाल. ज्यामध्ये आपल्या बाळाला पाहताच बलकौर सिंग भावूक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बलकौर सिंग हे बाळाला चमच्याने दूध पाजताना दिसत आहेत. सिद्धूच्या मृत्यूनंतर त्यांचे नुकसान कधीच भरून येणार नाही. पण या नवजात मुलाच्या जन्माने त्यांना जीवन जगण्यासाठी नक्कीच एक नवी आशा मिळाली आहे. चाहते सिद्धूच्या धाकट्या भावाचे सिद्धू म्हणूच स्वागत करत आहेत.
सिद्धू मुसेवाला हा त्याच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा होता. पण, २९ मे २०२२मध्ये पंजाबच्या मानस जिल्ह्यात सिद्धू मुसेवालाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येनंतर पंजाबमध्ये एकच खळबळ उडाली होती. सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वयोवृद्ध आई-वडिलांना कोणताही आधार नव्हता. म्हणून आयव्हीएफच्या मदतीने चरण कौर या गर्भवती राहिल्या. तेव्हापासून सिद्धूच्या चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं होतं. अखेर सिद्धूच्या घरी त्याच्या छोट्या भावाचं आगमन झालं आहे.