ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गजेंद्र अहिरेंच्या ‘दी सायलेन्स’ने भरारी घेतली आहे. मेक्सिको, बेल्जियम, पॅराग्वे, जर्मनी, बल्गेरिया, क्यूबा, अर्जेंटिना या देशातल्या चित्रपटांबरोबर यंदा पहिल्यांदा भारत स्पर्धा करणार आहे. एकंदर आठ चित्रपटांची स्पर्धा या ब्राझीलिया आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणार आहे. ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान ब्राझीलमध्ये होणाऱ्या या चित्रपट महोत्सवात प्रेक्षकांना ‘दी सायलेन्स’चा आनंद घेता येणार आहे. नेहमीच काही तरी नवीन देऊ पाहणाऱ्या गजेंद्र अहिरेंचा ‘दी सायलेन्स’ अशाच एका वेगळ्या विषयावर भाष्य करतो. याअगोदर ‘दी सायलेन्स’ने जर्मनीमध्ये होणाऱ्या इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मान मिळवला आहे. या चित्रपटासाठी गजेंद्र अहिरेंना जर्मन स्टार आॅफ इंडिया २०१५ च्या ‘डायरेक्टर्स व्हिजन’ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.हा चित्रपट सत्यकथेवर आधारित आहे. कोकणात राहणाऱ्या चिनीची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. आपल्या बाबांबरोबर राहणाऱ्या चिनीच्या आयुष्यातील एक काळा दिवस आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सोबत करणाऱ्या त्या आठवणी चित्रित करण्यात आल्या आहेत. दुष्कृत्य करण्यासाठी हपापलेले हात आणि त्यामुळे कोवळ्या जिवांची अकारण होणारी फरफट गजेंद्र अहिरे सांगून जातात. समाजात वाढत चाललेल्या दुष्प्रवृत्तींवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात नागराज मंजुळे, कादंबरी कदम आपल्याला प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हिंदीत नाव मिळवल्यानंतर अंजली पाटील पहिल्यांदाच मराठी सिनेमात येत आहे. त्याशिवाय हिंदीतला गाजलेला चेहरा रघुवीर यादव आपल्याला मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. मुग्धा चाफेकर आणि वेदश्री महाजन हे नवीन चेहरे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहेत.अश्विनी सिद्वानी, अर्पण भुखनवाला आणि नवनीत हुल्लड मोरादाबादी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून अश्विनी सिद्वानी यांनी चित्रपटाची कथाही लिहिली आहे. पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन अशा तिहेरी भूमिकेत गजेंद्र अहिरे आपल्याला दिसणार आहेत.
‘दी सायलेन्स’ची ब्राझील भरारी
By admin | Published: October 31, 2015 12:34 AM