एक बहीण यशाच्या शिखरावर पोहोचली आणि दुसरी बहीण आणि यशासाठी शेवटपर्यंत धडपडत राहिली. ही स्टोरी आहे. डिम्पल कपाडिया आणि सिम्पल कपाडिया या दोन बहिणींची. सिम्पल आठवण्याचे कारण म्हणजे, आज तिचा वाढदिवस. 15 आॅगस्ट 1958 रोजी जन्मलेली सिम्पल 80 व 90 च्या दशकात हिंदी सिनेमात सक्रीय होती.
1987 रोजी प्रदर्शित ‘इंसाफ’ या चित्रपटातून सिम्पलने फिल्मी करिअरची सुरुवात केली. यानंतर तिच्या वाट्याला आणखी काही चित्रपट आलेत. पण यात ती सहाय्यक अभिनेत्री म्हणूनच दिसली. आयुष्याची 10 वर्षे तिने अॅक्टिंग करिअर सावरण्यात घालवलीत. पण अखेरपर्यंत बहीण डिम्पल कपाडियासारखे यश तिला मिळवता आले नाही.
अॅक्टिंगमध्ये टिकाव लागणार नाही, हे कळताच सिम्पलने डिझाईनिंग क्षेत्राकडे मोर्चा वळवला आणि कॉस्च्युम डिझाईन करायला सुरुवात केली. रूदाली, रोक सको तो रोक लो, शहीद यासारख्या चित्रपटांसाठी तिने कॉस्च्युम डिझाईन केलेत. विशेष म्हणजे, रूदालीसाठी तिला बेस्ट कॉस्च्युम डिझायनरचा नॅशनल अवार्डही मिळाला. चित्रपटांशिवाय सिम्पलने तब्बू, प्रियंका चोप्रा, श्रीदेवी या मोठ्या हिरोईनसाठीही कपडे डिझाईन केलेत. एक डिझायनर म्हणून सिम्पलचे करिअर मार्गी लागले आणि नंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.
अभिनयक्षेत्रात कार्यरत असताना अभिनेता रंजीत आणि तिच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा मीडियात झाली होती. रंजीत आणि तिने काही चित्रपटांमध्ये एकत्र काम देखील केले होते. रंजीत यांच्या सिम्पल फिदा होती. अगदी त्यांच्या हेअरस्टाईलपासून तर त्यांची प्रत्येक अदा तिला आवडायची. पण सिम्पलचे जीजू म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना यांना हे प्रेमप्रकरण मान्य नव्हते आणि त्यावरून एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान राजेश खन्ना आणि रंजीत यांचे भांडण देखील झाले होते. राजेश खन्ना यांची संमती नसल्याने सिम्पलने या नात्याला पूर्णविराम दिला असे म्हटले जाते.
कॉस्च्युम डिझायनर म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली असतानाच अचानक सिम्पलला कॅन्सर असल्याचे निदान झाले आणि एक दिवस सिम्पलने जगाचा निरोप घेतला.