मुंबई : सुप्रसिद्ध गायक उदित नारायण यांचा मुलगा आदित्य नारायण याला वर्सोवा पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे. त्याने निष्काळजीपणे गाडी चालवत एका रिक्षाला धडक देऊन महिलेला जखमी केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याबाबत अधिक चौकशी सुरु असून त्याच्यावर भा. दं. वि च्या कलम 279 आणि 338 नुसार कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनीआदित्य नारायणला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.
वर्सोवा परिसरात आदित्य नारायण याने स्वतःच्या कारने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. ज्यात त्या रिक्षा चालक आणि आत बसलेली महिला प्रवासी गंभीररित्या जखमी झाली आहे. सोमवारी संध्याकाळी लोखंडवाला बॅकरोडच्या इंद्रलोक सोसायटीसमोर हा प्रकार घडला. नारायण हा त्याच्या बेंझ ( MH 14 FZ6000) ने भरधाव वेगाने या परिसरातून येत होता. त्याच वेळी (MH 02 DU 9827) या क्रमांकाच्या ऑटोरिक्षाला त्याने मागून धडक दिली. या अपघातात रिक्षात बसलेल्या सुरेखा शिवेकर (३२) आणि रिक्षाचालक बाबुराव पालेकर (६४) हे दोघे जखमी झाले. आदित्य नारायणने त्यांना अंधेरीच्या कोकीलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र या महिलेने नारायण विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार त्याच्यावर रॅश ड्राईव्हिंग आणि मोटर विहायकल ऍक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आदित्य नारायणला वर्सोवा पोलिसांनी अटक केली. जखमी महिलेचा आणि रिक्षा चालकाचा जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच नारायण याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्याच्या अहवालानुसार त्याच्यावर अतिरिक्त कलमे लावण्यात येतील.आदित्य नारायण हा अशा प्रकारच्या वादात सापडण्याची हि पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील त्याने एका खासगी एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्याला धमकावत शिवीगाळ केली होती. २०११ मध्ये देखील एका तरुणीला पाहून अश्लील शेरेबाजी केल्याप्रकरणी तिने आदित्य नारायणच्या श्रीमुखात भडकावली होती. आदित्य नारायण एका 'सिंगिंग रिऍलिटी शो' मध्ये अँकरिंग करत आहे. तसेच त्याने 'मासूम' आणि 'शापित' या हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.