बॉलिवूडचा गायक केके (KK) याचं ३१ मे रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. केकेचं संपूर्ण कुटुंब त्याच्या निधनाचे वृत्त समजताच कोलकातामध्ये पोहोचले आहे. केकेचा मृतदेह सध्या शवविच्छेदनासाठी सीएमआरई रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणा केली आहे की केकेला बंदूकीची अखेरची सलामी दिली जाईल. केके वर गुरुवारी २ जून,२०२२ रोजी मुंबईत अंतिम संस्कार होणार आहेत. केकेच्या पार्थिवाचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे की केकेच्या शवविच्छेदनासाठी वेळ लागू शकतो. तसेच,केकेला बंदूकीच्या फैरी झाडून अखेरचा सलाम दिला जाईल. केकेचं पार्थिव बुधवारी संध्याकाळी ५.४५ च्या विमानाने मुंबईत आणले जाईल.
मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत केकेवर अंत्यसंस्कार पार पडतील. आज संध्याकाळी कोलकाता हून मुंबईला केकेचं पार्थिव रवाना केले जाईल. कोलकाताहून ५.४५ चं विमान आहे. बोललं जात आहे की रात्री ९ च्या दरम्यान केकेचे पार्थिव मुंबईत पोहोचेल.
केके खरंतर एका म्युझिक कॉन्सर्टसाठी कोलकातामध्ये गेला होता. त्या शहरातील नजरुल मांचावर लाईव्ह परफॉर्मन्स देताना केकेची तब्येत अचानक बिघडली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.केकेनं बॉलिवूडमध्ये २६ वर्षांहून जास्त काळ कारकिर्द गाजवली आहे. या कारकिर्दित त्याने सलमान खान पासून शाहरुख पर्यंत सर्व दिग्गज कलाकारांसाठी गाणी गायली आहेत.