बॉलिवूडचा भाईजान सलमान खान गेल्या अनेक दिवसांपासून तणावात असेल यात शंका नाही. सलमानचे खास मित्र बाबा सिद्दीकींची हत्या आणि बिष्णोई गँगकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे सलमान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब सध्या चिंताग्रस्त झालंय. सलमान या प्रकरणी खुलेआम काही म्हणत असला तरीही त्याचे वडील सलीम खान आणि भावंडं वारंवार कुटुंबाच्या मानसिक अवस्थेबद्दल भाष्य करत आहेत. अशातच गायक मिका सिंगने त्याच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान सलमानला धमकी देणाऱ्यांची चांगलीच शाळा घेतलेली दिसतेय.
मिका सिंगने लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान भाईजानला केला सपोर्ट
मिका सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. या व्हिडीओत मिका सिंग एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना दिसतोय. मिका आणि सलमानची जिगरी मैत्री सर्वांना माहितच आहे. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान मिकाने 'शूटआऊट अॅट लोखंडवाला' सिनेमातील त्याच्या गाजलेल्या 'ए गणपत' गाण्यातील ओळी गायल्या. मिका म्हणाला, "सलमान खानसाठी एक ओळ गाऊ इच्छितो की, भाई हूं भाई, तू फिकर ना कर, उसकी माँ की, उसकी बहन की, जो देखे इधर, अपुन को बता दे कभी हो गयी फंटर, सबकी फटती अपने नाम से अपुन जाए जिधर, थोड़ा कोक-शोक हो तो अपुन के दोस्त को दे ना यार'
बिग बॉसच्या मंचावर सलमानने मांडल्या भावना
मिकाने या गोळी गायला सुरुवात करताच उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करुन मिकाला पाठिंबा दिला. सलमान खानने काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस १८' च्या मंचावर त्याच्या मनातील भावना शेअर केल्या होत्या. सलमान म्हणाला की, "भावनेच्या आधारावर या घरात कोणतंही नातं होता कामा नये. मला आज इथे यायचं नव्हतं. परंतु वर्क कमिटमेंट आहे. एक काम आहे जे करावं लागणार आहे. मला तुम्हालाही भेटायचं नव्हतं. मला यायचं नसूनही यावं लागलं. जर कोणावर भलंमोठं लांच्छन लागत असेल तर त्याच्या कुटुंबावर काय परिणाम होत असेल?"