आज वि.वा.शिरवाडकर यांची जयंती. वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं, असं म्हणता येईल. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या कविता, नाटकं आणि इतर साहित्याचा आजही लोकं आवडीने आस्वाद घेतात. कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा दिन' आज सगळीकडे साजरा केला जातोय. अशातच गायक-संगीतकार डॉ.सलील कुलकर्णींंनी कुसुमाग्रजांच्या राहत्या घरी जाऊन त्यांना सांगितीक आदरांजली दिली.
सलील कुलकर्णींनी याविषयी पोस्ट करुन लिहीलंय की, "कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी - त्यांच्या जन्मदिनी आणि मराठी भाषा दिनाच्या दिवशी शुभंकरला घेऊन जाता आलं… तात्यासाहेबांना वंदन करता आलं... शुभंकर आणि आज आमच्या कार्यक्रमात गाणी सादर करण्यासाठी आलेली गुणी गायिका सन्मिता धापटे- शिंदे ह्यांच्यासह कुसुमाग्रजांच्या खोलीत बसून त्यांचे शब्द गाता आले हे आमचं भाग्य आहे… मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा."
हा व्हिडीओ समोर येताच अनेकांनी कमेंट करुन सलील कुलकर्णींचं कौतुक केलंय. "माझे जगणे होते गाणे.." हे गाणं सलील कुलकर्णींनी गायलंय. त्यांचा मुलगा शुभंकरने त्यांना साथ दिलीय. याशिवाय 'सूर नवा ध्यास नवा' फेम गायिका सन्मिता धापटे शिंदे सुद्धा दिसून येतेय. सलील कुलकर्णींनी गायक म्हणून लोकप्रियता मिळवलीच. याशिवाय 'एकदा काय झालं' आणि 'वेडिंगचा शिणेमा' या सिनेमातून सलील कुलकर्णींनी दिग्दर्शक म्हणून सुद्धा दखलपात्र काम केलंय.