महाराष्ट्रात काल धक्कादायक घटना घडली. त्यामुळे सर्वांनाच चांगला हादरा बसला. बदलापूरमधील आदर्श महाविद्यालय या नामांकित शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर कर्मचाऱ्याने अत्याचार केले. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. बदलापूरमधील संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळावर येऊन ठिय्या आंदोलन केलं. या प्रकरणाचा सर्वच स्तरांमधून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. या प्रकरणावर अभिनेता-गायक उत्कर्ष शिंदेने पोस्ट लिहून संताप व्यक्त केलाय.
उत्कर्षची बदलापूर प्रकरणावर संतप्त पोस्ट
उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर दोन हातात बेड्या अडकवलेला माणूस दाखवलाय. बदलापूर रेप आणि POSCO ACT चा उल्लेख करुन उत्कर्ष लिहितो, "षंढासारखं वागायचं, मेंढरासारखं जगायचं आपल्या घरात थोडीच झालाय रेप कुणाचा म्हणत आपण फक्त बघ्या सारखं बसायचं." पुढे उत्कर्षने आणखी एक फोटो पोस्ट केलाय. यात ज्वाळा दिसत असून पाठमोरी छोटी मुलगी दिसत आहे. तिच्यावर Am I Next? असं लिहिण्यात आलंय. या फोटोवर उत्कर्ष लिहितो, "बाळ झोपलंय आवाज करु नका दचकेल म्हणणारे आपण आज तेच बाळ भीतीने मरायची वेळ आली तरीही शांतच का? समाजात बदल घडवायचा की नाही?"
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण
काल बदलापूरमधील आदर्श महाविद्यालयात घडलेला संतापजनक प्रकार उघडकीस आला. बदलापुरातील आदर्श महाविद्यालयातील शिशुवर्गात शिकणाऱ्या चार वर्षाच्या दोन मुलींवर शाळेतील सफाई कामगार अक्षय शिंदे याने ११ आणि १२ ऑगस्टला अत्याचार केल्याचा आरोप आहे. या अत्याचारानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. एवढेच नव्हे, तर पीडित मुलीच्या आईला पोलिस ठाण्याच्या परिसरारात १२ तास उभे करुन ठेवण्यात आले होते. त्यामुळे बदलापूरकर संतप्त झाले. त्यांनी तब्बल ८ तास रेल्वे रुळावर उतरुन आंदोलन केलं.