1979 साली आलेला 'सिंहासन' हा मराठी सिनेमा चांगलाच गाजला होता. चित्रपटात श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, रिमा लागू, नाना पाटेकर असे दिग्गज कलाकार होते. या चित्रपटाला 44 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त काल यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी चित्रपटाच्या आठवणींना उजाळा दिला. तर कार्यक्रमात नाना पाटेकरांनी सांगितलेला एक किस्सा ऐकून एकच हशा पिकला.
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे नाना पाटेकर नसीरुद्दीन शाहांवर किती जळतात याचा एक अफलातून किस्सा त्यांनी कार्यक्रमात सांगितला. नाना पाटेकर म्हणाले, 'मी देव मानत नाही त्याचं कारण असं आहे नसीरुद्दीन शाह. मी देवाला नवस केला होता की याचा अपघात होऊ दे याचे हातपाय मोडू दे म्हणजे त्याचे रोल मला मिळतील. याला काहीतरी वाईट होऊ द्या पण तसं काही झालंच नाही म्हणून माझा देवावरचा विश्वासच उडला.'
नाना पाटेकरांनी सांगितलेला हा किस्सा ऐकून प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळे, जब्बार पटेल आणि मोहन आगाशे उपस्थित होते. या दिग्गजांच्या उपस्थितीत 'सिंहासन' सिनेमाला ४४ वर्ष झाल्यानिमित्त स्क्रीनिंगही पार पडले. यावेळी सर्वांनीच अनेक आठवणी जाग्या केल्या.