उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं हक्काचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील (Smita Patil). ८० चा दशक गाजवणाऱ्या या अभिनेत्रीचं निधन होऊन आज बराच काळ लोटला आहे. मात्र, आजही त्यांच्या भूमिकांच्या माध्यमातून त्यांच्या आठवणी चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. बोलके डोळे आणि चेहऱ्यावरील मंद हास्य यामुळे स्मिता पाटील यांनी अनेकांची मनं जिंकली. परंतु, वयाच्या ३१ व्या वर्षीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आज स्मिता पाटील यांची जयंती आहे. दूरदर्शनची वृत्त निवेदिका ते यशस्वी अभिनेत्री या प्रवासात उत्तम सिनेमे देऊन तिनं चित्रपटसृष्टीत एक अढळ स्थान निर्माण केलं होतं.
17 ऑक्टोबर 1955 मध्ये पुण्यात स्मिता यांचा जन्म झाला. निखळ हास्याची देण त्यांना जन्मताच लाभलं होते. पाळण्यातील लेकीच्या चेह-यावरचं लोभस हास्य बघूनच तिच्या आईनं त्यांचं ‘स्मिता’ हे नामकरण केलं होतं. स्मिता या संवेदनशील आणि नैसर्गिक अभिनयासाठी ओळखल्या गेल्या. पण पडद्यावर गंभीर दिसणाररी स्मिता ख-या आयुष्यात कमालीच्या खोडकर होत्या. सिनेमांमध्ये येण्याआधी स्मिता या दूरदर्शनमध्ये वृत्तनिवेदिका होत्या. वृत्तनिवेदिका म्हणून साडी नेसणं बंधनकारक होतं.पण स्मिता यांना जीन्स आवडायची. मग त्या जीन्सवरच साडी नेसायच्या.
स्मिता यांचं खासगी आयुष्य बरंच वादळी राहिलं. अभिनेते राज बब्बर यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहत असताना त्यांना अनेकांचा रोष सहन करावा लागला. कारण राज बब्बर विवाहित होते. त्यांना दोन मुलं होती. विवाहित राज बब्बर स्मिता यांच्या प्रेमात आकंठ बुडाले. स्मिताही त्यांच्यासोबत राहू लागल्या. पण खुद्द स्मिताच्या आईला तिचे हे रिलेशन मान्य नव्हते. पण आईचे एक न ऐकता स्मिता यांनी राज यांच्यासोबत विवाह केला. मीडियाने टीका करण्यास सुरुवात केली. स्मिता यांना ‘घर फोडणारी महिला’ ठरवण्यात आलं. या टीकेने स्मिता आतून खचल्या होत्या. इतकी की, त्यांच्या संवेदनशील मनावर झालेले घाव परत कधीच भरले गेले नाही. सेटवर नेहमी आनंदी, उत्साही राहणाऱ्या स्मिता लग्नानंतर अचानक शांत झाल्या होत्या. अनेकदा राज बब्बरशी असलेले लग्न मोडून बाहेर पडण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता. अर्थात स्मिता यांनी असं काही केलं नाही. पण नियतीने मात्र हा विचार नेमका अमलात आणला. 13 डिसेंबर 1986 रोजी राज व स्मिता यांचा मुलगा प्रतिक याचा जन्म झाला. पण प्रतिकच्या जन्मानंतर अवघ्या १५ दिवसांत स्मिता यांनी जगाचा निरोप घेतला. राज बब्बर यांच्या आयुष्यातून स्मिता यांनी कायमची एक्झिट घेतली.
कदाचित स्मिता यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल आधीच लागली होती. आपण वयाच्या 31 व्या वर्षी मरणार आहोत, असं त्या पूनम धिल्लोन हिच्याशी बोलता बोलता म्हणाल्या होत्या. हा किस्सा स्वत: पूनम यांनीच एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितला होता.
मृत्यूनंतर आपलं पार्थिव नववधूप्रमाणे सजवलं जावं, अशी त्यांची इच्छा होती. मेकअपमॅन दीपक सावंत यांच्याकडे त्यांनी ही इच्छा बोलून दाखवली होती. निधनानंतर त्यांचं पार्थिव तीन दिवस बर्फात ठेवण्यात आलं होतं. कारण स्मिता यांची बहीण अमेरिकेत राहत होत्या. स्मिता यांच्यावर अत्यंसंस्काराची वेळ आली आणि तिची अखेरची इच्छा पूर्ण केली गेली. दीपक सावंत यांनी स्मिताच्या पार्थिवाचं नववधूप्रमाणे मेकअप केलं.