Join us

Smriti Irani Birthday Special : स्मृती इराणी यांनी वेटर म्हणून देखील केले आहे काम, वाचा त्यांचा आजवरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 4:06 PM

अभिनेत्री ते खासदार आणि केंद्रीय मंत्री इथपर्यंतचा स्मृती इराणी यांचा प्रवास अतिशय खडतर आहे.

ठळक मुद्देक्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे स्मृती यांचे आयुष्यच बदलले. त्यानंतर त्या बहुरानीयाँ, एक थी नायिका, विरुद्ध यांसारख्या मालिकांमध्ये झळकल्या.

स्मृती इराणी यांनी त्यांच्या करियरच्या सुरुवातीला आतिश, कविता, हम हैं कल आज और कल यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. पण त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही क्योंकी साँस भी भी बहू थी या मालिकेमुळे मिळाली. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी ही भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली होती.

क्योंकी साँस भी कभी बहू थी ही मालिका संपून आज अनेक वर्षं झाली असले तरी या मालिकेतील तुलसी ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या भूमिकेसाठी स्मृती यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले होते. 

अभिनेत्री ते खासदार आणि केंद्रीय मंत्री इथपर्यंतचा स्मृती इराणी यांचा प्रवास अतिशय खडतर आहे. त्या सध्या वस्रोद्योग व बाल कल्याण मंत्रालयाच्या मंत्री आहेत. स्मृती यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म 1976 ला दिल्लीत झाला. त्यांनी दिल्लीत त्यांचे शिक्षण घेतले. 1998 मध्ये त्यांनी मिस इंडिया पेजेंट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. त्यानंतर मिका सिंगच्या सावन में लग गई आग या प्रसिद्ध गाण्यात त्या झळकल्या. त्यांनी मॅकडॉनल्डमध्ये देखील काम केले आहे. तिथे मी भांडीदेखील घासली आहेत असे त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे.

क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेमुळे स्मृती यांचे आयुष्यच बदलले. त्यानंतर त्या बहुरानीयाँ, एक थी नायिका, विरुद्ध यांसारख्या मालिकांमध्ये झळकल्या. विरुद्ध या मालिकेची निर्मिती देखील त्यांनीच केली होती. तसेच रामायण या मालिकेत त्यांनी सीतेची भूमिका साकारली होती. 

स्मृती इराणी यांचे झुबिन इराणी यांच्यासोबत लग्न झाले असून झुबिन यांचे हे दुसरे लग्न आहे. स्मृती यांनी 2003 मध्ये अभिनयक्षेत्राला रामराम करत राजकारणात प्रवेश केला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. 

टॅग्स :स्मृती इराणी