स्मृती इराणी हे राजकीय क्षेत्रातील मोठं नाव आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी एकेकाळी तुलसी म्हणून घराघरात प्रसिद्ध होत्या. 'क्योंकी सास भी कभी बहु थी' या मालिकेतून त्यांना लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तुलसीची भूमिका साकारून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. टेलिव्हिजनचा लाडका चेहरा असलेल्या स्मृती यांनी नंतर राजकारणाची वाट धरली. पण, आता पुन्हा त्या टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत.
स्टार प्लसवरील अनुपमा या लोकप्रिय शोमधून स्मृती इराणी टेलिव्हिजन विश्वात कमबॅक करणार असल्याची माहिती टाइम्स नाऊने दिली आहे. अनुपमा मालिकेत १५ वर्षांचा लीप दाखविण्यात येणार आहे. यामध्ये स्मृती इराणी कैमिओ करताना दिसणार आहेत. १५ वर्षांनी स्मृती इराणी पुन्हा मालिकेत दिसणार असल्याने त्यांचे चाहतेही खूश आहेत.
क्योंकी सास भी कभी बहु थी या एकता कपूरच्या मालिकेतून स्मृती इराणींनी अभिनयात पदार्पण केलं होतं. पहिल्याच मालिकेने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक मालिका आणि काही सिनेमांमध्येही त्या दिसल्या. अमृता या बंगाली सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. २००९ मध्ये प्रसारित झालेल्या मणिबेन डॉट कॉम या कॉमेडी शोमध्ये स्मृती इराणी शेवटच्या दिसल्या होत्या. २००३ मध्ये स्मृती इराणींनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या सिनेइंडस्ट्रीपासून दूरच होत्या. आता १५ वर्षांनी पुन्हा त्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.