खासदार स्मृती इराणी यांनी काही वर्षांपूर्वी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत काम केले होते. या मालिकेत त्यांनी साकारलेली तुलसी ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. या मालिकेनंतर देखील त्या अनेक मालिकांमध्ये झळकल्या. त्या सध्या अभिनयक्षेत्रापासून दूर असल्या तरी त्यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर नुकतीच एका मराठी मालिकेची क्लिप शेअर केली आहे.
निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान यांची मुख्य भूमिका असलेल्या अग्गंबाई सासूबाई या मालिकेची भुरळ सध्या प्रेक्षकांना पडली आहे. पण त्याचसोबत खासदार स्मृती इराणी देखील या मालिकेच्या प्रेमात पडल्या आहेत असेच म्हणावे लागेल. कारण त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर या मालिकेतील एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओसोबत त्यांनी लिहिले आहे की, आई... भाषा अनेक पण भावना केवळ एकच... आईला केवळ एका अलिंगनाची आणि प्रेमाची गरज असते.
'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलंय. मालिकेचं नाविन्य, त्याची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी, इत्यादी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे.
मालिकेत नुकताच प्रसारित झालेला 'आई कुठे काय करते?' हा तेजश्रीचा भावस्पर्शी संवाद सध्या चांगलाच व्हायरल होतोय. हा प्रसंग तेजश्री प्रधान, निवेदिता सराफ आणि अभिनेता आशुतोष पत्की यांच्यावर चित्रित झालेला आहे. रोज घरीच असलेली आई नेमकं काय करते? अशी शंका मनात असणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. हा व्हिडीओ आतापर्यंत लाखांहून अधिक लोकांनी बघितला आहे. या प्रसंगातील मनाला भावणारा संवाद आणि तेजश्रीचा सहज सुंदर अभिनय चर्चेत आहे.
या प्रसंगाबद्दल बोलताना तेजश्री म्हणाली, "याचं सगळं श्रेय लेखकांचं आहे. पल्लवी करकेरा आणि किरण कुलकर्णी यांनी ते इतके छान आणि सहज लिहिले होते की, ते आपसूकच एक दोन वाचनात सादर करण्यात आले. आईसाठीच्या भावना त्यातल्या प्रत्येक शब्दातून प्रतिबिंबित होतात. त्यामुळे एक कलाकार म्हणून मी केवळ लेखकांचे शब्द प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. या विशिष्ट मोनोलॉगची फार तयारी मी मुद्दाम केली नव्हती, कारण त्यात माझा सादरीकरणात कुठलाही तांत्रिकपणा आणायचा नव्हता. त्यामुळे या दृश्याची तालीम न करता पहिल्या टेकमध्ये तो होण्याकडे माझे लक्ष होते. आमचे दिग्दर्शक अजय मयेकर यांनी तशी मोकळीक मला दिली. हे असे सीन ठरवून होत नाहीत. त्यात जरी मी दिसत असली तरी याचे श्रेय लेखक, दिग्दर्शक आणि सहकलाकार यांचंही तितकंच आहे. टीव्ही इंडस्ट्रीतील आपल्या मित्रमैत्रिणींकडून, चाहत्यांकडून कामाचे कौतुक होत असल्याने कामाची जबाबदारी अधिक आहे."