'क्योंकी सास भी कभी बहू थी' मालिकेतील तुलसी बनून स्मृती इराणी घराघरात पोहोचल्या. या मालिकेने त्यांना प्रसिद्धीच्या शिखरावर नेऊन ठेवलं. एकता कपूरच्या मालिकेमुळे स्मृती इराणी रातोरात स्टार झाल्या. 'क्योंकी सास भी कभी बहू थी'मुळे लोकप्रियता मिळाल्यानंतर स्मृती इराणींना सिनेमाच्याही ऑफर मिळाल्या होत्या. आमिर खानचा गाजलेला सिनेमा 'दिल चाहता है'ची ऑफर स्मृती इराणींना होती. पण, त्यांनी या सिनेमाची ऑफर नाकारल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला.
आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना मुख्य भूमिकेत असलेला 'दिल चाहता है' गाजलेल्या सिनेमांपैकी एक आहे. पण, या दिग्गजांबरोबर काम करण्यास स्मृती इराणींनी नकार दिला होता. दिल चाहता है मध्ये प्रीती झिंटा नाही पण त्याच तोडीच्या एका दुसऱ्या महत्त्वाची भूमिकेसाठी स्मृती इराणींना विचारणा झाली होती. या भूमिकेची ऑफर त्यांना देण्यात आली होती. पण, स्मृती इराणी या भूमिकेसाठी ऑडिशनच द्यायला गेल्या नाहीत. यामागचं कारणंही त्यांनी सांगितलं.
"मी ऑडिशन दिली नाही कारण मला माहीत होतं की मी हा चित्रपट करणार नाही. सिनेमात स्टार्स होते म्हणून नाही तर माझे गोल्स वेगळे होते. आणि मला याचा पश्चातापही होत नाही. आम्ही तेव्हा बेबी प्लॅनिंग करत होतो. मी कुटुंबाला वेळ द्यायचं ठरवलं होतं. म्हणून मी सिनेमाला नकार दिला होता," असं स्मृती इराणी म्हणाल्या.
अभिनयात करिअर घडवल्यानंतर स्मृती इराणी आता राजकारणात सक्रिय आहेत. त्या देशाच्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्या अमेठी येऊन भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढावणार आहेत.