अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आणि स्नेहा वाघ (Sneha Wagh) पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. त्या दोघी 'द ताज स्टोरी' (The Taaj Story) या बहुप्रतिक्षित हिंदी चित्रपटात झळकणार आहेत. ही डायनॅमिक जोडी चाहत्यांना एकत्र पाहण्याची अनोखी संधी असेल, परेश रावल यांच्यासारख्या दिग्गज व्यक्तीच्या सोबत प्रोजेक्टमध्ये त्यांची अनोखी कामगिरी पाहण्यासाठी फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.
बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये भाग घेतल्यानंतर अभिनेत्री स्नेहा वाघ घराघरात पोहचली आहे. आता तिने परेश रावलसोबत 'द ताज स्टोरी'चे शूटिंग यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. तुषार अमरीश गोयल दिग्दर्शित, हा बहुप्रतिक्षित चित्रपट ताजमहाल आणि आग्रा येथील आसपासच्या ठिकाणी शूट करण्यात आला आहे. तसेच देहरादून आणि उत्तराखंडमध्ये चित्रित केलेल्या मुख्य दृश्यांसह भारताच्या ऐतिहासिक स्थळांचे वैभव कॅप्चर केले आहे. निर्माते सीए सुरेश झा, लेखक-दिग्दर्शक तुषार अमरीश गोयल आणि क्रिएटिव्ह प्रोड्यूसर विकास राधेशाम यांच्यासह चित्रपटाच्या क्रूने ४५ दिवसांचे शूट पूर्ण केले आहे.
परेश रावल, अमृता खानविलकर आणि स्नेहा वाघ यांच्यासोबत, ताज स्टोरीमध्ये प्रभावी कलाकारांचा समावेश आहे. झाकीर हुसेन एका वकिलाची व्यक्तिरेखा साकारत असून, कथनात गूढता आणत आहे, तर अमृता खानविलकर पत्रकाराची भूमिका साकारत आहे, प्रतिष्ठित अभिनेते अखिलेंद्र मिश्रा, बिजेंद्र काला, शिशिर शर्मा, श्रीकांत वर्मा आणि अभिजीत लेहरी प्रत्येकी महत्त्वपूर्ण भूमिकांसह चित्रपटात योगदान देतील. द ताज स्टोरी पुढील वर्षी रिलीज होणार आहे.