जगभरातील साईभक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिका आस्थेने बघत आहेत आणि त्यातील कथानक, कथेची मांडणी याचे कौतुक करत आहे. शिर्डी येथील साईंच्या समधीला 100 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेची सुरुवात झाली होती. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत असून त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावत आहेत. या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघची एंट्री झाली आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तुळसा ही म्हाळसापतीची बहीण असून ती शिर्डीला आली असल्याची दाखवण्यात आले आहे. तिची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावत आहे. या मालिकेच्या सेटवर तर स्नेहा सगळ्यांची लाडकी बनली आहे.
एखाद्या कलाकाराला आपल्या पारंपारिक पोशाखात वावरायला मिळण्यासारखा दुसरा आनंद नाही. स्नेहा वाघला मेरे साई या मालिकेमुळे ही संधी मिळत आहे. या मालिकेत स्नेहाची वेशभूषा एकदम मराठमोळी आणि पारंपारिक आहे. जेव्हा स्नेहाला या मालिकेतील तिच्या वेशभूषेविषयी कळले होते, तेव्हा तिला अत्यंत आनंद झाला होता. स्नेहा तब्बल १२ वर्षांनंतर नऊवारी साडी नेसत आहे. नऊवारी साडी नेसण्यासाठी ती खूपच उत्सुक होती. स्नेहा या मराठमोळ्या पारंपारिक वेशात खूपच सुंदर दिसत आहे. तिला तिच्या फॅन्सच्या खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. यावर स्नेहा वाघ सांगते की, मेरे साई मधील ही भूमिका माझी आवडती आहे. या मालिकेच्या माध्यमातून मला तब्बल १२ वर्षांनंतर नऊवारी साडी नेसण्याची संधी मिळाली. या आधी मी २००६ मध्ये एका व्यावसायिक नाटकासाठी नऊवारी साडी घातली होती. मला नऊवारी साडी खूप आवडते. तो एक आरामदायक पेहराव आहे असे मला वाटते. मला महाराष्ट्रीय असल्याचा गर्व आहे. मालिकेत शुटींग दरम्यान बऱ्याचदा मी नऊवारी साडी स्वत:च नेसते. कारण मराठी असल्यामुळे मी लहानपणापासूनच घरामध्ये माझ्या आजीला, आईला नऊवारी साडी नेसताना पाहत आले आहे.