छोट्या पडद्यावरील 'तू माझा सांगाती' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय ठरली.अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत पंढरपूरच्या पांडुरंगाची निस्सीम भक्ती करणाऱ्या तसंच संत परंपरेतील एक थोर, संत तुकाराम यांचा जीवनपट उलगडणारी ही मालिका प्रत्येक रसिकाला भावली. या मालिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर याने संत तुकाराम यांची महत्त्वाची आणि मध्यवर्ती भूमिका साकारली. आपल्या दमदार अभिनयाने चिन्मयने या भूमिकेत प्राण ओतत संत तुकाराम छोट्या पडद्यावर साकारले. याच भूमिकेमुळे चिन्मयला रसिकांचं विशेष प्रेम मिळत असून त्याचंही या भूमिकेशी विशेष नातं जडलं आहे. गेल्या ४ वर्षांपासून रसिकांचं मनोरंजन करणारी ही मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
त्यामुळे एक अभिनेताच नाही तर लेखक म्हणूनही मालिकेशी घट्ट आणि भावनिक नातं निर्माण झालेल्या चिन्मयने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. संत तुकारामांच्या वेशभूषेतील मालिकेतील हा फोटो चिन्मयने शेअर केला आहे. या फोटोला चिन्मयने खास असं कॅप्शनही दिले आहे.
‘निरंजनी आम्ही बांधियेले घर।निराकार निरंतर राहिलोसे॥ ‘तू माझा सांगाती’ आता अखेरच्या पर्वाकडे’ असं कॅप्शन चिन्मयने या फोटोला दिले आहे. मराठी रंगभूमी, मराठी सिनेमा आणि छोट्या पडद्यावर वैविध्यपूर्ण तसंच दमदार भूमिका साकारणारा अभिनेता अशी चिन्मयने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच आपल्या लेखन कौशल्याने लेखक म्हणूनही तो छाप पाडत आहे. आंतरमहाविद्यालयीन एकांकिकापासून सुरु झालेला चिन्मयचा हा प्रवास नक्कीच कौतुकास्पद म्हणावा लागेल. मात्र तू माझा सांगाती या मालिकेशी चिन्मयचं एक वेगळेच भावनिक नातं आणि बंध जोडले गेले असल्याचे या फोटो आणि पोस्टमधून स्पष्ट होत आहे.