सोशल मीडिया कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकर (Ankita Prabhu-Walawalkar) हिची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. कोकणी गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंकिताने नुकतीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या भेटीत तिने राज ठाकरे यांच्या मनसे पक्षासाठी मालवणी भाषेत गाऱ्हाणं घातलं आहे. मनसे अधिकृत या इन्स्टाग्राम पेजवर अंकिताचा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो तुफान व्हायरल होत आहे.
अलिकडेच अंकितासह नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे या प्रसिद्ध मराठी कंन्टेंट क्रिएटर्सनी राज ठाकरे (raj thackeray) यांची भेट घेतली. यावेळी शर्मिला ठाकरे व मनसे नेते अमेय खोपकरही उपस्थित होते. विशेष म्हणजे या भेटीची चर्चा सध्या सर्वत्र होत असून अंकिताने राज ठाकरेंसमोर मालवणीत गाऱ्हाणं घातलं.
“आज या ठिकाणी आम्ही सगळे जण जमलेलो असा…ते सगळेजण तुला गाऱ्हाणं घालतो ते मान्य करुन घे रे महाराजा…महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचो व्याप उत्तरोत्तर वाढत जाऊं दे रे महाराजा… मनसेच्या इरोधात जर कुणी काय केला असात वाकडानाकडा…तर त्याचो डाव त्याचारचं उलटां दे रे महाराजा… होय महाराजा ! बारामताचं गणित एक कर, वडाची साल पिंपळात कर…हिकडचं आमदार हिकडचं ऱ्हवांदे , पण तिकडचो आमदार हिकडं कर रे महाराजा”, असं गाऱ्हाणं अंकिताने घातलं आहे.
दरम्यान, मनसे अधिकृतवर हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर तो तुफान व्हायरल झाला आहे. इतकंच नाही तर अनेकांनी अंकिताचं कौतुकही केलं आहे. अंकिता प्रसिद्ध सोशल मीडिया कंन्टेंट क्रिएटर असून ‘कोकण हार्टेड गर्ल’ या नावाने तिचं सोशल मीडिया पेज आहे. अंकिता कंन्टेंट क्रिएटर असण्यासोबतच व्यावसायिकही आहे. तिचं कोकणात रेसॉर्टदेखील आहे.