टिक टॉक स्टार ते लावणी क्वीन असा प्रवास करणारी गौतमी पाटील (gautami patil) सध्या चांगलीच चर्चेत येत आहे. आपल्या हटके लावणी स्टाइलमुळे लोकप्रिय ठरलेल्या गौतमीच्या याच लावणीवर अनेकांनी आक्षेप घेत तिच्यावर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर गौतमीवर अश्लील लावणी करत असल्याचा आरोप होत असतानाही तिच्या कार्यक्रमांना आज तितकीच गर्दी होते. गौतमी सोशल मीडियावरही चांगलीच अॅक्टीव्ह असून तिचा चाहतावर्ग तिकडेही तुफान आहे. विशेष म्हणजे सध्या सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येणाऱ्या गौतमीसाठी हा प्रवास सोपा नव्हता. गौतमीने खऱ्या आयुष्यात बराच मोठा स्ट्रगल केला असून वडिलांनी कुटुंबाला वाऱ्यावर सोडल्यामुळे गौतमीने लावणीची वाट धरल्याचं सांगण्यात येतं.
खानदेशी कन्या आहे गौतमी
आपल्या लावणीने अनेकांना वेड लावणारी गौतमी खानदेशी मुलगी आहे. धुळ्यामधील सिंधखेडा या गावात गौतमीचा जन्म झाला. गौतमी याच गावात लहानाची मोठी झाली. परंतु, गौतमीचा जन्म झाल्यानंतर तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडून दिलं. वडिलांनी सोडल्यानंतर गौतमीच्या आईच्या वडिलांनी तिचं संगोपन केलं. आठवीमध्ये असताना गौतमीने शिक्षण अर्ध्यावर सोडलं आणि ती पुण्यात राहायला आली.
गौतमी आणि तिची आई पुण्यात राहायला आल्यानंतर तिच्या वडिलांनी पुन्हा त्यांना घरी आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांसोबत पुन्हा राहिला लागल्यानंतर त्यांनी आईला मारहाण करणं, दारुचं व्यसन करणं सुरु ठेवलं. त्यामुळे पुन्हा या मायलेकी वडिलांपासून वेगळ्या झाल्या. गौतमीचा सांभाळ करण्यासाठी गौतमीची आई नोकरी करत होती. मात्र, त्यांचाही अपघात झाला. त्यानंतर घरची जबाबदारी गौतमीवर येऊन पडली.
गौतमीच्या लावणी करिअरची झाली सुरुवात
आईच्या अपघातामुळे घरची जबाबदारी उचललेल्या गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. गौतमीने पहिल्यांदाच अकलूज लावणी महोत्सवात लावणी सादर केली. त्यावेळी तिला ५०० रुपये मानधन मिळालं होतं. त्यानंतर खऱ्या अर्थाने गौतमीचा लोककला क्षेत्रातील प्रवास सुरु झाला. सुरुवातीच्या काळात गौतमीने बॅकडान्सर म्हणून काम केलं. त्या काळात ती पुणे, कोल्हापूर येथेच शो करायची. मात्र, तिची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे आता ती महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, शहरात शो करु लागली आहे.