Join us

'आसूड' मधून जपण्यात आले सामाजिक भान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2019 8:00 AM

व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल.

ठळक मुद्देअनु मलिक ‘आसूड’ चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत ‘आसूड’ मध्ये हेच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न झाला आहे

व्यवस्थेतील अनास्थेच्या प्रश्नावर फक्त हळहळण्या व्यतिरिक्त फारशी कृती घडताना कधी दिसत नाही. व्यथित करणारी समाजातील हीच गोष्ट निलेश रावसाहेब जळमकर या सर्जनशील दिग्दर्शकाच्या मनात खोलवर रुजते आणि त्यातून एका चित्रपटाची कथा जन्म घेते. शेतकऱ्यांच्या सद्य परिस्थितीने व्यथित झालेल्या या दिग्दर्शकाच्या ‘आसूड’ या चित्रपटातून याचे प्रतिबिंब न उमटते तरच नवल. व्यवस्थेनं पिचलेली माणसं हतबल असतात. त्यातील काही बंडखोर होत आवाज उठवतात, व्यवस्थेला आव्हान देतात. त्यामुळे व्यवस्था काही प्रमाणात हादरते हाच धागा पकडून ‘आसूड’ चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे.

आपल्या या कलाकृतीबद्दल बोलताना निलेश रावसाहेब जळमकर सांगतात की, ‘राजकारणाशी जवळचे संबध असल्याने व्यवस्था जवळून अनुभवली आहे. व्यवस्था प्रक्रियेचे सुलभीकरण झाले तर जनसामान्यांना त्याचा लाभ घेता येईल हे मला प्रकर्षाने वाटते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी निघणाऱ्या मोर्चा, धोरण, अशा अनेक आंदोलनाचा मी साक्षीदार आहे. वर्तमानपत्रांतून आणि नियतकालिकांतून शेतकऱ्यांच्या प्रश्नाचा वेध घेताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की, चित्रपटाच्या माध्यमातून हा विषय प्रभावीपणे मांडत या समस्येकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन आपल्याला देता येईल. राजकीय पक्षांच्या होणाऱ्या दुर्लक्षामुळे जनसामान्यांच्या बोथट झालेल्या संवेदना आणि त्यातून निर्माण होणारे प्रश्न या वस्तुस्थितीवर 'आसूड' चित्रपटातून प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नामुळे व्यथित झालेला एक सुशिक्षित तरुण कोणता मार्ग अवलंबतो याचे चित्रण यात पहायला मिळेल. सिनेमा हे समाजावर खोलवर परिमाण करणारं प्रभावी माध्यम आहे, ह्यावर दृढ विश्वास असल्याने ‘आसूड’ चित्रपटातून व्यवस्थेच्या अनास्थेचा प्रश्न मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.

जनसामान्यांची मानसिक आणि सामाजिक घुसमट व त्यांच्या स्थितीचे भेदक चित्रण दाखवताना व्यवस्थेच्या आणि समाजाच्या डोळ्यांत अंजन घालणारा ‘आसूड’ चित्रपट प्रेक्षकांसाठी  नक्कीच प्रेरणादायी ठरेल. चित्रपटाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पहाता त्यासोबत सामाजिक जाणीवेने काहीतरी करण्याच्या उद्देशाने सामाजिक बांधिलकी जपणारा हा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न मी केला आहे. समाजातील घडामोडीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न माझ्या चित्रपटांमधून मी कायमच केला आहे. आजच्या सुजाण प्रेक्षकांनां विषयाच्या व्याप्तीची जाणीव करून दिली तर त्या जाणिवा त्यांच्यापर्यंत थेट पोहचतील. शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव करून देणाऱ्या ‘आसूड’ मध्ये हेच सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न झाला आहे

गोविंद प्रोडक्शन प्रस्तुत ‘आसूड’ चित्रपटाची निर्मिती डॉ.दीपक मोरे यांची असून सहनिर्मिती विजय जाधव यांची आहे. लेखन व दिग्दर्शन निलेश रावसाहेब जळमकर तर सहदिग्दर्शन अमोल ताले यांचे आहे. कथा–पटकथा आणि संवाद निलेश रावसाहेब जळमकर व अमोल ताले यांचे आहेत. छायांकन अरुण प्रसाद यांनी केले असून संकलन सचिन कानाडे यांचे आहे. विक्रम गोखले, प्रदीप वेलणकर, माधव अभ्यंकर, अनंत जोग, दीपक शिर्के, उपेंद्र दाते, संदेश जाधव, कमलेश सावंत यांच्यासोबतच हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे राणा जंगबहादूर, अवतार गील हे नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. त्यांच्यासोबतच अमित्रीयान पाटील आणि रश्मी राजपूत ही जोडी या चित्रपटात झळकणार आहे.

विशेष म्हणजे आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत देणारे राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड विजेते संगीतकार अनु मलिक ‘आसूड’ चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी प्रथमच मराठीत पाऊल ठेवलं आहे.

'व्यवस्था बदलायला पाहिजे' यासाठीचा जबरदस्त आत्मविश्वास आजच्या पिढीत आहे. आणि या तरुण पिढीने मनात आणलं तर ते ही व्यवस्था नक्कीच बदलू शकतात हे दाखवून  देणारा ‘आसूड’  प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन आवश्य पहावा असे आवहान दिग्दर्शक निलेशरावसाहेब जळमकर करतात.

टॅग्स :आसूडअमित्रियान पाटील