सोहा अली खान (Soha Ali Khan) आणि कुणाल खेमू बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. सोहाने कुणालशी लग्न केलं तेव्हा तिला धार्मिक कारणांवरुन खूप ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र आता या कुटुंबाचे अनेकजण चाहते आहेत. त्यांना इनाया की क्युटच मुलगीही आहे. सोहा आणि कुणाल दोन्ही धर्मांचं पालन करतात आणि इनायालाही तशीच शिकवण देतात. सोहाने नुकतंच बऱ्याच वर्षांनी 'छोरी २' मधून सिनेमात कमबॅक केलं आहे. यानिमित्त एका मुलाखतीत तिने आपल्याला मुलगी झाल्यामुळे कुटुंबातील काही जण निराशही झाल्याचा खुलासा केला आहे.
'छोरी २' हा सिनेमा स्त्री भ्रूण हत्या या सामाजिक विषयावर आहे. नुसरत भरुचाने सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. तर सोहाने खलनायिकेचं काम केलं आहे. नुकतंच 'स्क्रीन'ला दिलेल्या मुलाखतीत सोहा म्हणाली,"आजच्या काळातही काही शिकले सवरलेले लोक मुलगाच व्हावा अशी आशा करतात. मला मुलगी आहे आणि मी खूप खूश आहे. माझ्या आजूबाजूचेही अनेक लोक खूश आहेत, मात्र काही असेही आहेत जे यामुळे निराश आहेत."
सोहाने तिच्या आजीचा संघर्षही सांगितला. ती म्हणाली, "माझ्या आजीला बंगालमध्ये एम.ए करायचं होतं. पण तिला शिकू दिलं नाही. कारण तेव्हा पुरुषांनाच उच्च शिक्षणासाठी पाठवलं जायचं. महिलांना जाऊ दिलं जात नव्हतं. पण तिने हार मानली नाही. तिची एम.ए ची फीस ५० रुपये होती. तिच्या वडिलांनी सांगितलं की मी तुला साडीसाठी ५० रुपये देईन. पण तिने शिक्षणासाठी हट्ट धरला. ती आमच्या कुटुंबातील पहिली महिला आहे जिने एम.ए केलं आहे."
शर्मिला टागोर यांच्याविषयी सोहा म्हणाली, "माझ्या आईला लोक नेहमी विचारायचे की कसं काय तुझ्या पतीने तुला अभिनेत्री असूनही काम करायची परवानगी दिली. कारण तेव्हा चांगल्या मुली अभिनयात जात नाहीत असं म्हटलं जायचं. आता बघा मी स्वत: ३६ व्या वर्षी लग्न केलं आहे पण कधी कोणी मला त्यावरुन प्रश्न विचारायचं नाही. मी तर बेबी प्लॅनिंगही बरंच उशिरा केलं."