चित्रपट निर्माते व दिग्दर्शक राम गोपाल वर्मा त्यांच्या वादग्रस्त ट्विटसाठी ओळखले जातात. त्यांच्या ट्विट कधी नवा वाद ओढवून घेईल, हे सांगता यायचे नाही. सध्या त्यांचे एक ट्विट चर्चेत आहे. होय, लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात सरकारने दारूची दुकाने उघडण्यास सशर्त परवानगी दिली आणि दारूच्या दुकानाबाहेर तळीरामांच्या रांगाच रांगा लागल्या. आता यावर राम गोपाल वर्मा बोलणार नाहीत, हे शक्यच नाही. पण त्यांचे नेमके लक्ष गेले ते दारूच्या दुकानांबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलांकडे. दारूच्या दुकानापुढे महिलांची रांग पाहून त्यांनी एक ट्विट केले आणि त्यांच्या या ट्विटने गायिका सोना मोहपात्रा जाम खवळली.
रामगोपाल वर्मा यांनी काय केले ट्विटदारूच्या दुकानांबाहेरच्या रांगेत कोण उभे आहे, पाहाच़ याच नंतर स्वत:च्या काळजीपोटी दारू पिणा-या पुरूषांबद्दल गळे काढतात..., असे खोचक ट्विट रामगोपाल वर्मा यांनी केले.
अलीकडे राम गोपाल वर्मा यांनी ‘मी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आत्ताच मला माझ्या डॉक्टरांनी सांगितले आहे,’ असे ट्विट करून खळबळ उडवून दिली होती. नंतर माझे हे ट्विट एप्रिल फूल असल्याचे सांगत त्यांनी क्षमायाचना केली होती.
सोना संतापली
राम गोपाल वर्मांचे हे खोचक ट्विट बॉलिवूड सिंगर सोना मोहपात्रा हिला खटकले आणि ती राम गोपाल यांच्यावर उलटली. ‘राम गोपाल वर्मा तुम्हालाही एक लाईनमध्ये उभे होण्याची गरज आहे. जिथे तुम्हाला खरे शिक्षण मिळेल. पुरूषांप्रमाणे महिलांनाही मद्य खरेदीचा अधिकार आहे. पण हो, कुणालाही मद्यपान करून हिंसा करण्याचा अधिकार नाही,’ असे सोनाने त्यांना सुनावले.