मराठी कलाविश्वातील अप्सरा असा नावलौकिक मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी (sonalee kulkarni). 'नटरंग', 'हिरकणी', 'मितवा' अशा गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेल्या सोनालीने आता मल्याळम सिनेमातही एन्ट्री केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची सध्या जोरदार चर्चा आहे. यामध्येच सोनालीने इंडस्ट्रीतील धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे. एक काळ असा आला होता जेव्हा सोनालीवर इंडस्ट्री सोडण्याची वेळ आली होती.
अलिकडेच सोनालीने सिद्धार्थ कननला एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्ट्रगल काळाविषयी भाष्य केलं. यावेळी तिने कलाविश्वात तिला कसा स्ट्रगल करावा लागला, कशा अडचणी आल्या हे सगळं सांगितलं.
"ज्यावेळी मी लोकांना नाही म्हणायला सुरुवात केली त्यावेळी माझ्या आयुष्यात अडचणी यायला सुरुवात झाली. त्यानंतर त्या लोकांनी मला कसा त्रास होईल याची योग्य काळजी घेतली. कारण, ते त्या पोझिशनवर होते. त्यांनी त्या पोझिशनचा गैरवापर केला, इतरांवर दबाव टाकला. आता मी विचार करते की, त्यावेळी ते सिनेमा केले असते तर फारसा फरक पडला नसता. पण मला त्या भूमिका करायच्या नव्हत्या," असं सोनाली म्हणाली.
पुढे ती म्हणते, "असे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं की, आपण अशा जागी आहोत जेथे अभिनेत्री आपल्यासाठी ही गोष्ट करेल. पण, मी त्या गोष्टींना नकार दिला म्हणून त्यांनी पुरेपूर काळजी घेतली की मी कशा प्रकारे त्या प्रोडक्शन आणि त्या चॅनेलबरोबर काम करणार नाही. मला कुणी काम देणार नाही. मला सेटवर एकटं पाडण्यात येत होतं. माझं मानसिक खच्चीकरण करण्यात येत होतं. मला माझ्याच गाण्यावर नाचल्याबद्दल रॉयल्टी मागण्यात येत होती".
दरम्यान, 'अप्सरा आली'वर डान्स केला म्हणून मला मेल रॉयल्टी पाठवा असे मेल यायचे. इतके इतके पैसे भरा वगैरे. ते फार घाबरवणारं होतं. खूप अनपेक्षित होतं. सोनालीने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सोनाली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत येत असते. सोनालीने कुणाल बेनोडेकर याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.