मुलीच्या चेहऱ्यावर डाग अथवा पिंपल्स दिसला की तिला लगेचच टेन्शन येते. ते डाग घालवण्यासाठी ती अनेक प्रयत्न करायला लागते. काही मुली तर डाग दिसू नये यासाठी मेकअप देखील करतात. अभिनेत्री तर आपल्या चेहऱ्याच्याबाबतीत प्रचंड सजग असतात. पण असे असूनही सोनाली कुलकर्णीने तिचा बिना मेकअपचा फोटो सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी पोस्ट केला होता.
या फोटोसोबत तिने लिहिले होते की, माझ्या त्वचेवर गेल्या चार महिन्यांपासून उपचार सुरू असून माझ्या चेहऱ्यात चांगलाच बदल जाणवत आहे. आणखी तीन महिने उपचार सुरू राहाणार आहे. माझ्या चेहऱ्यात बदल करण्यासाठी डॉक्टरांचे आभार...
काही महिन्यांपूर्वी सोनालीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या पोस्टमध्ये आपल्याला तिच्या चेहऱ्यावरचे डाग पाहायला मिळाले होते. एक अभिनेत्री असून देखील तिने आपल्या चेहऱ्यावरचे डाग दाखवण्याची हिंमत केली होती. या फोटोत तिच्या चेहऱ्यावर असणारे चट्टे आणि पिंपल्स स्पष्ट दिसत होते. या फोटोसोबत सोनालीने लिहिले होते की, नटरंग या चित्रपटानंतर मी त्वचेच्या विविध समस्यांना तोंड देत आहे. माझ्या चेहऱ्यावरील चट्ट्यांमुळे मला चित्रपट देखील गमवावे लागले होते. या सगळ्याचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला होता.
पुढे तिने लिहिले होते की, मी काही काळानंतर या गोष्टीचा स्वीकार केला आणि माझी त्वचा जशी आहे, तशीच तिला स्वीकारायचे असे ठरवले. तुमच्या चेहऱ्यावर कितीही पिंपल्स, डाग असले तरी त्याची लाज बाळगू नका. तुम्ही तुमच्या समस्यांचा स्वीकार केला तरच त्यावर मात करू शकता...