- संजय घावरे............................
दर्जा: ***1/5 कलाकार : सोनाली कुलकर्णी, सचित पाटील, सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, योगेश सोमण, भरत जाधव, नागेश भोसले, पुष्कर जोग, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे, सुबोध घाडगे, नमीष चाफेकरदिग्दर्शक : संजय जाधवनिर्माते : अक्षय बदार्पूरकरशैली : म्युझिकल ड्रामाकालावधी : २ तास ४ मिनिटे..........................
नेहमीच काहीतरी वेगळ्या करण्याची मराठी चित्रपटांची परंपरा जपत ‘तमाशा लाईव्ह’च्या माध्यमातून एक वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काव्याच्या माध्यमातून चित्रपटाची कथा सादर करताना समाजाला आरसा दाखवण्याचं काम या चित्रपटाद्वारे सिनेमॅटोग्राफर-दिग्दर्शक संजय जाधवनं केलं आहे. कलाकारांच्या उत्तम अभिनयाला तंत्रज्ञानाची सुरेख जोड देत संजयनं जणू एक सांगीतिक मेजवानीच सादर केली आहे. टीआरपीमागं धावणाऱ्या टीव्ही पत्रकारितेचा बुरखा फाडत संवेदनाहीन झालेल्या समाजातील तमाशाचा ‘लाईव्ह’ खेळ यात मांडला आहे.
चित्रपटाची कथा भडक मेकअप किंवा शो शायनिंग न करता साधेपणानं काम करणाऱ्या शेफाली नावाच्या नवख्या टिव्ही पत्रकाराभोवती गुंफण्यात आली आहे. एका छोट्याशा वाहिनीसाठी काम करणारी शेफाली टीव्ही पत्रकारितेतील वाघ अशी ओळख असणाऱ्या अश्विनला आदर्श मानत असते. अश्विनला भेटल्यावर मात्र तिचा गैरसमज दूर होतो. अश्विन तिचा अपमान करतो. अश्विननं दिलेलं चॅलेंज स्वीकारून आपल्या ध्येयाच्या दिशेनं झेपावण्यास सज्ज झालेली शेफाली रिक्षातून जात असताना एका टॉवरवरून खाली पडलेली मुलगी तिला दिसते. ही खळबळजनक बातमी दिल्यानं एकीकडं शेफालीचं चौफेर कौतुक होतं, तर दुसरीकडं अश्विनचा टीआरपी घसरतो. त्यानंतर तमाशाचा फड कसा रंगतो ते पहायला मिळतं.
'तमाशा LIVE' या चित्रपटाचं तिकीट बुक करण्यासाठी इथे क्लिक करा.
लेखन-दिग्दर्शन : वृत्तवाहिन्यांना केंद्रस्थानी ठेवून वेगळ्या पद्धतीनं लिहिलेली कथा हे या चित्रपटाचं सर्वात मोठं वेगळेपण आहे. गाण्याच्या प्रवाहाशी एकरूप होणारी कथा आणि कथानकाला गतिमान करणाऱ्या गीतरचना असं काहीसं पटकथा लेखन करण्यात आलं आहे. दिग्दर्शक संजय जाधवनं दोन्हींना अचूक न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अरविंद जगताप यांनी मार्मिक संवादलेखन केलं आहे. वृत्तवाहिन्यांमधील स्पर्धा, ब्रेकींग न्यूजसाठी चढाओढ, वृत्त निवेदकांची पाहुण्यांवरील कुरघोडी, आदर्शवत मुखवटाधारी चेहऱ्याचा पदार्फाश, स्पर्धेत सामील झाल्यावर बदलणारे खरे चेहरे, नीतीमूल्ये जपणारे खरे पत्रकार, राजकारण्यांच्या दावणीला असलेली पत्रकारिता, एखाद्या बातमीची केली जाणारी चिरफाड, राजकीय डावपेच, समाजातील विविध घटकांची मते आणि बातमीच्या खेळात ज्यांच्या घरातील व्यक्ती गेली त्यांच्या भावनांकडे होणारं दुर्लक्ष असे विविध पैलू यात उलगडण्यात आले आहेत. मध्यंतरापूर्वीपर्यंत काही गोष्टींचा उलगडा नीट होत नसल्यानं थोडा कंटाळा येतो, पण मध्यंतरानंतर चित्रपट खऱ्या अर्थानं उत्सुकता वाढवतो. क्षितिज पटवर्धन यांनी प्रसंगानुरूप गीतलेखन केलं आहे. अमितराज आणि पंकज पडघम यांनी नांदी, लावणी, रॅप, भांगडा, भरतनाट्यम, गरबा, सवाल-जवाब असे गाण्यांचे विविध प्रकार रंजकपणे सादर केले आहेत. या सर्व गाण्यांवर उमेश जाधवनं उत्तम कोरिओग्राफी केली आहे. कॉस्च्युमवरही मेहनत घेतली आहे. नजर खिळवून ठेवणारं कॅमेरावर्क आहे. एकाच सीनमध्ये दोन ठिकाणी शूट केलेली दृश्ये अत्यंत सुरेखरित्या एडिट करून सादर केली आहेत.
कलाकार : सुरुवातीला साधी-भोळी आणि नंतर डॅशिंग पत्रकार अशा आपल्या भूमिकेच्या दोन बाजू सोनालीनं कुठेही अतिशयोक्ती न करता सादर केल्या आहेत. आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळी शेफाली साकारताना सोनालीनं अभिनय आणि नृत्याचा मिलाफ घडवला आहे. यशानं आंधळा झाल्यानं इतरांना तुच्छ मानत राजकारण्यांच्या दावणीला बांधलेली पत्रकारीता सचित पाटीलनं सुरेखरित्या सादर केला आहे. सूत्रधारांच्या रूपात विविध व्यक्तिरेखा साकारण्याच्या मिळालेल्या संधीचं सिद्धार्थ जाधव आणि हेमांगी कवी यांनी सोनं केलं आहे. योगेश सोमण यांनी साकारलेला प्रामाणिक पत्रकारही स्मरणात राहणारा आहे. भरत जाधव, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे यांनी चांगली साथ दिली आहे.
'तमाशा LIVE' या चित्रपटाचं तिकीट बुक करण्यासाठी इथे क्लिक करा.
सकारात्मक बाजू : आजवर कधी न करण्यात आलेला काव्यचित्रपटाचा अनोखा प्रयोग आणि कथानकातील रहस्य अखेरपर्यंत खिळवून ठेवतं.
नकारात्मक बाजू : चाकोरीबद्ध चित्रपटांच्या चौकटीतून बाहेर पडून करण्यात येणारे वेगळे प्रयोग पचनी न पडणाऱ्यांना हा चित्रपट आवडणार नाही.
थोडक्यात : एका मराठमोळ्या दिग्दर्शकानं समाजातील वास्तव चित्र दाखवताना काव्यचित्रपटाचा अनोखा प्रयोग करत सजवलेल्या या गीत-संगीताच्या अनोख्या मैफिलीचा एकदा तरी अनुभव घ्यायला हवा.