‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ या चित्रपटानं नवा इतिहास रचला. बॉक्स ऑफिसवर नवं नवे विक्रम रचले. ‘बाहुबली’च्या याच अभूतपूर्व यशाला मानवंदना देत या चित्रपटांना मराठी साजशृंगार चढवला गेला. अर्थात हे दोन्ही सिनेमे मराठीत डब केले गेले. ‘शेमारू मराठीबाणा’ या वाहिनीवर हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित झालेत.अभिनेते दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी सांभाळली आणि डॉ. अमोल कोल्हे,सोनाली कुलकर्णी, गश्मीर महाजनी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, मेघना एरंडे अशा अनेक मराठी कलाकारांनी या चित्रपटांतील पात्रांना आपला आवाज दिला. महाराष्ट्राची ‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) आपल्या आवाजात देवेसेनेचं पात्र जिवंत केलं. याच निमित्ताने सोनालीने ‘लोकमत’ला खास मुलाखत दिली. ‘बाहुबली’तील देवसेनेला आवाज देण्याची संधी मिळाली आणि मला देवसेना नव्यानं गवसली, असं सोनाली यावेळी म्हणाली.
अर्ध्या दिवसात ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’मी डब केला...‘बाहुबली’तील देवसेनेला आवाज देण्याची संधी सोनालीकडे कशी चालून आली तर असं विचारता असता ती म्हणाली, ‘बाहुबली’ मराठीत तयार होतोय. तेव्हा देवसेनेला तुझा आवाज देशील का? अशी विचारणा ‘शेमारू मराठीबाणा’कडून मला केली गेली होती. एका सिनेमासाठी डबिंग माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. एकाचवेळी उत्सुकता आणि आनंद अशी त्यावेळी भावना होती. त्यांची माझ्या आवाजाच्या काही क्लिपिंग मागवल्या. देवसेनेच्या पात्रासाठी त्यांच्याकडे तीन चार पर्याय होते. पण सरतेशेवटी माझी निवड झाली. माझा आवाज युनिक आहे आणि तेच त्यांना हवं होतं. मग सगळं ठरलं आणि अर्ध्या दिवसात ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’मी डब केला.
देवसेना मला नव्यानं गवसली... ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ डब करतानाची एखादी सुंदर आठवण वा गंमत आठवते का? असं विचारलं असता हे काम करताना मला मज्जा आली, असं ती म्हणाली. अख्खा सिनेमा मराठीत डब करणार म्हटल्यावर एखाद्या शब्दाचे समानार्थी शब्द, आवाजातील चढऊतार असं सगळं अनुभवताना मी हा चित्रपट जणू प्रत्यक्ष जगले. देवसेना मला नव्यानं गवसली, असं ती म्हणाली.
कधी तरी तुम्ही नक्की चमकाल...डबिंग क्षेत्रात नव्या लोकांना मोठी संधी आहे. या क्षेत्रात करिअर करणाºयांना सोनालीने काही टीप्सही दिल्यात. तुमच्या आवाजातील ‘युनिकनेस’ ओळखा. डबिंग क्षेत्रात खूप संधी आहे आणि यात करिअर करायचं असेल तर आधी स्वत:वर विश्वास ठेवायला शिका. अमिताभ बच्चन सारख्या महानायकाचा आवाजही कधी काळी नाकारला गेला होता. हे लक्षात घेऊन प्रयत्न करत राहा. कधी तरी तुम्ही नक्की चमकाल, असं ती म्हणाली.
श्रेयससाठी मी ‘पुष्पा’ पुन्हा पाहिला...सुरूवातीला केवळ अॅनिमेटेड सिनेमे डब व्हायचे. पण आता साऊथचे, हॉलिवूडचे सिनेमेही हिंदी, मराठीत डब होऊ लागले आहेत. त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड संधी आहे. पुष्पा या सिनेमाचंच उदाहरण घ्या. श्रेयसने या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनच्या पात्राला आवाज दिला. मला आधी हे माहित नव्हतं. श्रेयसने या चित्रपटाला आवाज दिला म्हटल्यावर मी पुन्हा पुष्पा पाहिला, असं तिने सांगितलं.
डबिंग म्हणजे सिनेमा नव्यानं जगणं...डबिंग काय आहे तर अॅक्टिंगच आहे. परफॉर्मिंग आर्टचाच हा एक भाग आहे. डबिंग करताना अख्खा सिनेमा माईकसमोर बसून रिक्रिएट केला जातो. आम्ही आमच्या स्वत:च्या सिनेमाचंही डबिंग करतो तेव्हा तो सगळा सिनेमा नव्याने जगत असतो. त्यामुळे डबिंग आणि अॅक्टिंग हे एकमेकांना पूरक आहेत. त्याला वेगळं काढून जमणार नाही, असं सोनाली म्हणाली.