Join us

२६/११ ला ताजमहाल हॉटेलमध्ये अडकली होती 'ही' मराठमोळी अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2024 10:42 AM

2008 साली झालेल्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अभिनेत्री अडकली होती.

मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे सोनाली खरे (sonali khare).  मराठी तसेच हिंदीमध्येही सोनालीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मुळची डोंबिवलीची असलेली सोनाली खरे उत्तम नृत्यांगनाही आहे. सोनालीने हिंदी अभिनेता बिजय आनंदसोबत विवाह केला आहे. 2008 साली झालेल्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात सोनाली अडकली होती. त्यावेळच्या काही थरारक आठवणी सोनालीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितल्या.

सोनालीने नुकतंच 'प्लॅनेट मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत एक धक्कादायक अनुभव शेअर केला. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या दिवशी सोनाली आणि तिचा पती बिजय आनंद ताज हॉटेलमध्ये अडकल्याचं तिनं सांगितलं.  सोनाली म्हणाली, ' हा माझा दुसरा जन्म आहे असं मी नेहमी म्हणते. कारण त्या रात्री आम्हाला अशी अजिबात आशा नव्हती की, आम्ही सुखरूप बाहेर पडू. सनाया चार महिन्यांची होती. आम्हाला बाहेर जायचं होतं; पण कधी जाणं व्हायचं नाही. माझे मिस्टर म्हणाले की, चल, आज मी तुला ताज हॉटेलला डेटवर घेऊन जातो आणि म्हणून आम्ही तिथे गेलो होतो.  एक तासाभरात येईन, असा विचार करून मी मुलीला मी घरी ठेवून गेलेले.  आम्ही हॉटेलमध्ये शिरलो. अचानक त्या सगळ्याची सुरुवात झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आम्ही तिथेच अडकलो होतो'.

पुढे ती म्हणाली, 'सगळ्या घडामोडी कळत होत्या. पण आमची सुटका दिसत नव्हती. मग मी माझ्या आईला, सासूला, माझ्या मित्र-मैत्रिणींना हळूहळू एक-एक फोन करायला सुरुवात केली होती की, मला काही वाटत नाही आहे की, आता आम्ही इथून येऊ. तेव्हा माझ्या डोक्यात मुलीच्या भविष्याची प्लॅनिंग सुरू झाली होती. नशिबानं आम्ही दुसऱ्या दिवशी सुखरूप बाहेर पडलो. मी घरी गेले आणि आश्चर्याची गोष्ट अशी की, माझी चार महिन्यांची लेक अजिबात उठली नव्हती आणि मला तिची भीती होती की, तिला भूक लागली, तर काय होईल', असं सोनाली म्हणाली.

टॅग्स :सोनाली खरेसेलिब्रिटी