Join us

ड्रीम वेडिंग ते आयसोलेटेड रजिस्टर मॅरेज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 15:37 IST

मला एकाच व्यक्तीशी चार वेगवेगळ्या प्रकारे लग्न करायचं होतं. मी मराठी असल्याने मराठमोळं लग्न, आई पंजाबी असल्याने गुरुद्वारामध्ये लग्न, व्हाईट वेडिंगची आवड असल्यानं व्हाईट वेडिंग गाऊन घालून चर्चमधून बाहेर पडणारं फँटसी ड्रीमही मी पाहिलं होतं आणि लग्नाचा चौथा प्रकार आपल्या नवऱ्याने निवडावा, असं वाटत होतं. 

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री -खरं तर माझ्या लग्नातच माझी खूप फजिती झाली. माझ्या लग्नाबाबत लोकांनी अगोदरच खूप वेगवेगळे कयास लावले होते. मी लग्न केलंय, नाही केलंय, कधी केलंय, कोणाशी केलंय, कुठे केलंय, कसं केलंय... याची चर्चा कायम सुरू असायची. अगदी माझ्या करिअरची सुरुवातच ‘गाढवाचं लग्न’ या चित्रपटापासून झाली. त्यामुळे माझ्याशी निगडित लग्नाचे खूप कॉन्ट्रोव्हर्सिअल किस्से आहेत. मला एकाच व्यक्तीशी चार वेगवेगळ्या प्रकारे लग्न करायचं होतं. मी मराठी असल्याने मराठमोळं लग्न, आई पंजाबी असल्याने गुरुद्वारामध्ये लग्न, व्हाईट वेडिंगची आवड असल्यानं व्हाईट वेडिंग गाऊन घालून चर्चमधून बाहेर पडणारं फँटसी ड्रीमही मी पाहिलं होतं आणि लग्नाचा चौथा प्रकार आपल्या नवऱ्याने निवडावा, असं वाटत होतं. 

अशा लग्नाविषयीच्या माझ्या काही गंमतीशीर फँटसीज होत्या. दरम्यानच्या काळात माझ्या लग्नाबाबत खूप अफवा उडाल्या आणि त्याचा मला खूप त्रासही झाला. खूप डिस्टर्ब झाले होते. एका पॉइंटनंतर मी सर्व काही स्वीकार करत असा विचार केला की, जेव्हा कधी मी लग्न करेन तेव्हा लोकांना कळेलच आणि सत्य बाहेर येईलच. 

मात्र वास्तवात जेव्हा लग्न करायला गेले तेव्हा कोरोनानं अशी काही फजिती केली की, जन्मभर कधीच विसरणार नाही. कुणालला दुबईमध्ये भेटल्यावर २०२० मध्ये साखरपुडा केला आणि २०२१ मध्ये लंडनमध्ये एका सुंदर फोर्टमध्ये लग्न करायचं ठरलं.  पण अचानक लॉकडाऊन झालं आणि माझ्या लग्नाच्या प्लॅनची फजिती झाली. त्या काळात मी पाच महिने दुबईत अडकले होते. जून २०२१ मध्ये आम्हाला लग्न करता येणार नसल्याने सर्व प्लॅन्स कॅन्सल करावे लागले. 

दुबईत जेव्हा हळूहळू थोडीफार सुरुवात झाली, तेव्हा रजिस्टर मॅरेज करायचं ठरवलं. कारण कुणालचे आई-बाबा लंडनमध्ये, माझे आई-बाबा मुंबईमध्ये आणि कुणाल व मी दुबईमध्ये अशा तीन वेगळ्या ठिकाणी आम्ही अडकलो होतो. 

त्यामुळे आमचं ड्रीम वेडिंग अखेर आयसोलेटेड रजिस्टर मॅरेजपर्यंत येऊन पोहोचलं होतं. ज्यात फक्त मी आणि कुणाल होतो. दोघांचेही आई-बाबा झूम कॉल्सवर होते. त्यांनी तिथूनच आशीर्वाद दिले. 

दुबईमध्ये बेसिक हिंदू समारंभ करून मग रजिस्टर करावं लागत असल्याने मंदिरात जाऊन मंगळसूत्र, पुष्पहार आणि कुंकू इतका ऐवज घेऊन लग्न केलं. आमचं लग्न करणाऱ्या ब्राह्मणाने साक्ष दिल्यावर मॅरेज सर्टिफिकेट मिळणार होतं. अशा पद्धतीने केवळ सहा मित्रांच्या उपस्थितीत आमचं रजिस्टर मॅरेज झालं.

लग्नाच्या बाबतीत माझी झालेली ही सर्वात मोठी फजिती... हा किस्सा इथेच संपत नाही. माझ्या लग्नात हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या आणखी काही रोमांचक गोष्टी घडल्या, पण त्या पुढल्या वेळेस कधीतरी...

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी अभिनेतासेलिब्रिटी