मराठीसह अन्य बहुभाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा डंका वाजवणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी(Sonali Kulkarni) अलिकडेच सोनालीने तिचा ४६ वा वाढदिवस साजरा केला. आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र चाहता वर्ग निर्माण करणाऱ्या सोनालीने गिरीश कर्नाड यांच्या 'चेलुवी' या कन्नड चित्रपटातून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर हळूहळू तिचा मोर्चा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला. आज सोनाली मराठीतील दिग्गज अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु, तिने मराठीसह अन्य ७ भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विशेष म्हणजे यात एका इटालियन चित्रपटाचाही समावेश आहे हे फार मोजक्या लोकांना माहित आहे.
सोनालीने २००६ मध्ये 'फुओको सु दी मी' (fuoco su di me) या इटालियन चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटाला मिलान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारदेखील मिळाला होता. या चित्रपटात ती महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकली होती.
सोनालीचे गाजलेले चित्रपट
सोनालीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. यात ‘दिल चाहता है’, ‘सिंघम’, ‘मिशन कश्मीर’, ‘डरना जरुरी है’, ‘दिल-विल प्यार-व्यार’, ‘प्यार तूने क्या किया’ हे तिचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजले. बॉलिवूडसह तिने ‘कैरी’, ‘देवराई’, ‘दोघी’, ‘मुक्ता’, ‘सखी’, ‘अग बाई अरेच्चा 2’ आणि ‘देऊळ’ या मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.