Join us

श्रीदेवी यांच्यासोबत सोनाली कुलकर्णीचा वाद होता चर्चेत, नक्की काय कारण होतं वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 11:39 AM

सोनालीचा एक सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला होता. तेव्हा श्रीदेवी यांनी...

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) आज ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. मराठी आणि गुजराती आर्टिस्ट म्हणून सोनाली लोकप्रिय आहे. 'दिल चाहता है'मधील तिची भूमिका चांगलीच गाजली. सोनाली कुलकर्णी अतिशय प्रभावशाली अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. पण एकदा तिच्यात आणि श्रीदेवी यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. सोनालीचा एक सिनेमा ऑस्करसाठी निवडला गेला होता. तेव्हा श्रीदेवी यांनी या सिनेमाबद्दल फारसं ऐकलं नाही असं म्हटलं होतं. 

सोनाली कुलकर्णीने हिंदी सिनेमात थोडंफार काम केल्यानंतर आपला मोर्चा मराठी आणि गुजरातीकडे वळवला होता. 2012 साली जेव्हा श्रीदेवीचा इंग्लिश विंग्लिश रिलीज झाला होता त्यानंतर सोनालीचा गुजराती सिनेमा 'द गुड रोड' रिलीज झाला होता. गंभीर विषयावरील या सिनेमाची ऑस्करसाठी निवड झाली होती. तेव्हा श्रीदेवी यांनी हा कोणता सिनेमा आहे? कधी ऐकलं नाही मग हा सिनेमा कसा ऑस्करसाठी जाऊ शकतो? असं म्हटलं होतं. श्रीदेवी यांचे इतर भाषेतील सिनेमांबद्दल असे विचार आहेत हे पाहून सोनालीला राग आला होता. फक्त हिंदी चित्रपट चांगले असतात असं नाही. प्रत्येक भाषेत चांगले चित्रपट बनतात आणि जे पात्र असतील ते ऑस्करसाठी जातात. दोघींची ही वक्तव्य जास्तच वाढली होती जेव्हा या भांडणात करण जोहर आणि अनुराग कश्यपही पडले. हिंदीवाल्यांनी ऑस्कर एन्ट्रीसाठी एकाधिकार केलाय याला तोडलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रातील सिनेमाला पुढे येण्याची संधी मिळाली पाहिजे असं सोनाली म्हणाली होती. 

सोनाली तिच्या करिअरमध्ये अतिशय मोजके सिनेमे करते पण ते चोख करते. खूप काळजीपूर्वक ती स्क्रीप्ट निवडते. कामाशिवाय ती आपल्या कुटुंबासोबतही वेळ घालवते. तिला एक नऊ वर्षांची मुलगी आहे. तिच्यासोबतही सोनालीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. आजच  तिचा 'शॉर्ट अँड स्वीट' हा मराठी सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाची कथाही खूपच हटके आहे ज्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीश्रीदेवीबॉलिवूड