Join us

पोस्टर गर्ल बकुळा म्हणते, ट्रोलिंग हा तर धुरळा, झटकून टाका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 11:54 AM

लोकमतच्या कार्यक्रमात सोनाली कुलकर्णीने मांडले मत...

पुणे : सिने क्षेत्रात काम करताना भाषा अवगत असणं, त्यावर प्रभुत्व असणं... भूमिकांसाठी अभ्यास करणं, त्याची तालीम करणं, अभ्यास करणं... भूमिकांमधून सृजनशीलतेची कास धरणं त्यातून समाजाला एक संदेश देणं... चित्रपटासाठी केवळ अभ्यास कामाचा नसून समाजाचा भाग असणं गरजेचं... सोशल मीडियातील ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करून सकारात्मक बाजूंकडं पाहणं गरजेचं... अशी वेगवेगळीे प्रगल्भ मतं व्यक्त करत सौंदर्यासोबत बुद्धिमत्ताही असल्याचं उत्तम उदाहरण अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं दाखवून दिलं. निमित्त होतं ‘लोकमत’नं आयोजित केलेल्या सन्मान भूमिपुत्रांचा या कार्यक्रमाचं...

लोकमत’च्या मार्केटिंग विभागातील ओंकार दीक्षित यांनी घेतलेल्या छोटेखानी मुलाखतीतून ही प्रगल्भ सोनाली दिसून आली. यावेळी तिनं खुलेपणानं आपली मतं व्यक्त केली. या क्षेत्रात आल्यानंतर मला सुरुवातीला भाषा अवगत करावी लागली. त्यावर प्रभुत्व असणं गरजेचं असतं. त्यामुळे पहिल्याच चित्रपटाच्या वेळी मी अख्खं स्क्रिप्टच पाठ केलं होतं. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला. मात्र, भाषेचा हेल, लहेजा पाळताना त्याचा अभ्यासही गरजेचा असल्याचं मत तिनं व्यक्त केलं.

मराठीत यशस्वी झाल्यानंतर मला हिंदी, इंग्रजी चित्रपटांसाठीही विचारणा झाली. मात्र, तुला हिंदी स्पष्ट बोलता येईल का, कारण तू ग्रामीण मराठीच भूमिका करतेस. शहरातील भाषा तुला येत नसेल, असा प्रश्न विचारला गेला. मी त्यांना शहरातीलच असल्याचे सांगावे लागत होते. मात्र, माझ्यासाठी ही बाब अभिमानास्पद होती. मी या मातीतील भूमिका साकारत असल्याची ती पावती होती. सबंध महाराष्ट्रानं त्या भूमिका स्वीकारल्या याचा मनस्वी अभिमान असल्याच्या भावना तिनं बोलून दाखवल्या.

मातीशी असणारे नाते लाभदायी असते. ग्रामीण जीवन जगत असताना माती आणि ग्रामीण जीवनाशी सृजनशीलता असणे महत्त्वाचे असते. हिरकणी साकारत असताना भूमिकेसाठी सहा महिने तालीम केली. त्यासाठी गोठ्यातील काम, शेणानं सारवणं, कड्यावरून चढणं याचा सराव केला. प्रेक्षकांना भूमिका खरी कशी वाटेल हे महत्त्वाचे असते. शूटिंगपूर्वी घेतलेले कष्ट चित्रपट यशस्वी झाल्यानंतर कष्टाचं सोनं झालं असं वाटलं, असंही ती यावेळी म्हणाली.

पोस्टर गर्ल, बकुळा, धुरळा, आदी चित्रपटांतील भूमिका साकारताना ग्रामीण जीवन अनुभवता आले. चित्रपटात काम करताना नुसता अभ्यास करून जमत नाही, तर ती भूमिका जगावी लागते. त्यासाठी त्या वातावरणात, त्या लोकांमध्ये जाऊन अनुभव घ्यावे लागतात. चित्रपटात भूमिका जिवंत कराव्या लागतात, असा अनुभव सोनालीनं सांगितला.

भूमिका साकारताना सृजनशीलताही महत्त्वाची असते. आम्ही मनोरंजन करणारे आहोत. मात्र, आमच्या भूमिकांमधून समाजात प्रबोधन होत असल्यास हलक्या फुलक्या पद्धतीने समाजातील वाईट बाबींवर डोस दिला जात असल्यास त्या भूमिकांना न्याय दिल्याचं समाधान मिळतं असं तिनं आवर्जून सांगितलं. प्रत्येक चित्रपट यशस्वी होईलच असं नाही. कारण तो करताना त्या भागातील असणं गरजेचं असतं. केवळ अभ्यास करून होत नाही. त्यामुळे अपयशही महत्त्वाचं असतं, असं ती म्हणाली.

सध्या सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंग होत आहे. त्याबाबत आपणच त्या निंदकाला आपल्या घरात जागी दिली आहे. ते स्वीकारावे लागेलच; पण त्यातील सकारात्मक गोष्टी घ्याव्यात. सगळेच चांगले नसतात किंवा वाईटही नसतात. देव कोण अन् राक्षक कोण हे आपण ठरवावं असं उत्तर तिनं यावेळी दिलं.

अहो असं काय करताय...

यावेळी सोनालीनं साकारलेल्या बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटांतील "अहो असं काय करताय" हा डायलॉग म्हणताच हॉलमध्ये एकदम टाळ्यांचा कडकडाट झाला.

टॅग्स :पुणेलोकमतसोनाली कुलकर्णीसोशल मीडिया