सोनम कपूर आपल्या परखड वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. आपल्या या परखड वक्तव्यांसाठी सोनमला अनेकदा ट्रोल व्हावे लागले. ताजे प्रकरणही असेच. त्याचे झाले असे की, सोनम कपूरने मुंबईच्या खराब रस्त्यांवर पोस्ट केली. ‘मला शहरात पोहोचायला २ तास लागले. अजूनही मी पोहोचलेली नाही. रस्ते खराब आहेत आणि प्रदूषणही जास्त. घरातून बाहेर पडणे जणू एखाद्या वाईट स्वप्नासारखे आहे...’, असे सोनमने लिहिले.
ही पोस्ट व्हायरल झाली आणि सोनम ट्रोल झाली़ तिच्या या पोस्टवर अनंत वासू नावाच्या व्यक्तिने सोनमला चांगलेच खणखणीत उत्तर दिले.
‘तुमच्या सारखे लोक प्रवासासाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट व कमी तेल पिणाऱ्या गाड्यांचा वापर करत नाहीत. तुला माहितीये, तुझ्या अलिशान गाड्या केवळ ३ ते ४ किमी प्रति लीटर मायलेज देतात. तुझ्या घरातील १०-२० एसी सुद्धा ग्लोबल वॉर्मिंगसाठी जबाबदार आहेत. आधी तू तुझ्यापासून होणारे प्रदूषण कमी कर,’ असे या युजरने लिहिले. अनंत वासूचे हे उत्तर बघून सोनम चांगलीचं भडकली आणि दोघांचीही जुंपली. ‘तुझ्या सारख्या पुरूषांमुळे महिला पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत नाही. त्यांना छेडछाडीची भीती वाटते,’असे सोनमने त्याला सुनावले. यावर अनंत वासूने पुन्हा सोनमला डिवचले आणि ट्रोलिंगचा ‘सिलसिला’ सुरू झाला.याआधीही सोनम कपूर अनेकदा ट्रोल झाली आहे. काळवीट शिकारप्रकरणी तिने सलमान खानची पाठराखण केल्यावर ती अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल झाली होती.