सोनम कपूरचा आज म्हणजेच 9 जूनला वाढदिवस असून ती प्रसिद्ध अभिनेता अनिल कपूरची मुलगी आहे. तिचा जन्म झाला, त्यावेळी अनिल चेंबूरमध्ये राहात होता. सोनम काही महिन्यांची असताना ते जुहूमध्ये राहायला गेले. जुहूतील आर्य विद्या मंदिर या शाळेत तिचे शिक्षण झाले असून ती लहानपणी खूपच खट्याळ होती. तिचा खेळात प्रचंड रस असून तिने शालेय जीवनात रब्बी, बास्केटबॉल यांसारखे खेळ खेळलेले आहेत. तसेच तिने कथ्थकचे धडे देखील गिरवले आहेत.
आज सोनमने बॉलिवूडमध्ये आपली एक जागा निर्माण केली आहे. सावरिया या चित्रपटाद्वारे तिने तिच्या बॉलिवूडमधील कारकिर्दीला सुरुवात केली. तिने दिल्ली 6, रांजना, खुबसुरत, प्रेम रतन धन पायो, नीरजा, पॅडमॅन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिचे लग्न गेल्यावर्षी आनंद आहुजा या व्यवसायिकासोबत झाले असून ते दोघे अनेक वर्षं नात्यात होते.
सोनमचे वडील अभिनेता अनिल कपूर हा बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता असला तरी त्याने त्याच्या मुलीचे पालनपोषण एखाद्या स्टार किड प्रमाणे केलेले नाहीये. तिला रोजच्या वापरासाठी पैसे न देता तिने ते स्वतः कमवावेत असे अनिल आणि सुनीताचे म्हणणे होते. तुम्हाला विश्वास बसणार नाही.... पण कॉलेजमध्ये असताना सोनमने वेटर म्हणून काम केले आहे. ती तिचा पॉकेट मनी स्वतः कमवत असे.
सोनम आज आघाडीची अभिनेत्री असली तरी अभिनेत्री बनण्याचे तिने कधीच ठरवले नव्हते. तिने संजय लीला भन्साळी यांच्याकडे साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात केली होती. ब्लॅक या चित्रपटासाठी तिने त्यांच्यासोबत काम केले होते. तिने अभिनयक्षेत्रात यावे असे संजय लीला भन्साळी यांनी तिला सुचवले होते. सुरुवातीला तिने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले. पण काही महिन्यांनंतर तिने या गोष्टीसाठी होकार दिला. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तिने जवळजवळ 30 किलो वजन कमी केले. आज ती तिच्या अभिनयासोबतच तिच्या स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखली जाते.