अभिनेते अनिल कपूर यांचा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या फोटोत अनिल कपूर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत दिसत आहेत. या फोटोवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाही तर अनिल कपूर यांच्यासोबत सोनम कपूरलाही ट्रोल करण्यात येत आहे. या फोटोवर सोशल मीडियावर तिला तिचं मतही विचारण्यात आलं. त्यावर तिनेदेखील तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
दिल्लीमधील शाहिनबाग इथे झालेल्या गोळीबाराचा निषेध करत सोनम कपूरने नुकतीच एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने म्हटलं की, तुम्ही स्वत:ला हिंदू मानत असाल तर कर्म आणि धर्म या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि अशा घटना या दोन्ही गोष्टींमध्ये बसत नाहीत. तिच्या याच ट्विटवर अनिल कपूर यांचा दाऊदसोबतचा फोटो शेअर करत एका युजरने सोनमला प्रश्न केला. तू नेहमीच बेधडकपणे तुझी मतं मांडतेस. दाऊदसोबत तुझ्या वडिलांचा फोटो हा त्यांच्या कर्माशी संबंधित आहे की धर्माशी हे कृपया तू देशाला सांगशील का, असा सवाल एका युजरने केला.
यावर सोनमने उत्तर दिलं की, या फोटोचा संबंध क्रिकेटशी आहे, भारताच्या क्रिकेटशी तिने आणखीन एक ट्विट करत म्हटले की, ते (अनिल कपूर) राज कपूर आणि कृष्णा कपूर यांच्यासोबत १९९० मध्ये शारजाह येथे क्रिकेट मॅचसाठी गेले होते. कोणीतरी त्यांचा फोटो काढला आणि त्यांना माहितसुद्धा नव्हतं की त्यांच्यासोबत कोण कोण व्यक्ती उभे आहेत. द्वेष पसरवण्यासाठी आणि दुसऱ्यांना दुखावण्यासाठी देव तुम्हाला माफ करो अशी मी प्रार्थना करेन.