Join us

'मी काही भिकारी सिंगर नाही...', सोनू निगम भडकला, पण कोणावर आणि का?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2022 1:56 PM

Sonu Nigam : दुबईत स्थायिक झालेल्या सोनूने नुकतंच ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमासाठी गाणं रेकॉर्ड केलं. ते पण फक्त आमिर खानमुळे..

बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय गायक सोनू निगम (Sonu Nigam) दीर्घकाळापासून चित्रपटसृष्टीपासून लांब आहे. गेल्या काही वर्षापासून तो दुबईत स्थायिक झालाये. कामानिमित्ताने भारतात येत असला तरी आता दुबई हेच त्याचं घर बनलं आहे. तूर्तास काय तर सोनू भडकला आहे. होय, आजकालच्या संगीत दिग्दर्शकाच्या काम करण्याच्या पद्धतीवर त्याने नाराजी व्यक्त केली आहे. प्रोजेक्ट मिळवण्यासाठी ऑडिशन देणं, हेही त्याला मान्य नाही. ‘बॉलिवूड हंगामा’ला दिलेल्या एका ताज्या मुलाखतीत सोनूने हा सगळा संताप बोलून दाखवला. मी काही भिकारी सिंगर नाही, अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला.

हे म्हणजे स्वयंवरात उभं राहण्यासारखं...आजकाल म्युझिक डायरेक्टर एकच गाणं अनेक सिंगरच्या आवाजात रेकॉर्ड करतात आणि नंतर प्रोड्यूसर, अ‍ॅक्टर व म्युझिक डायरेक्टर काय ते ठरवतात. कोणत्या सिंगरचं गाणं सिनेमात घ्यायचं, याचा निर्णय ते घेतात. हे म्हणजे, स्वयंवरासारखं आहे. मला यात सामील होण्यात काहीही इंटरेस्ट नाही, असं सोनू या मुलाखतीत म्हणाला.

मी आमिर खानसाठी गायलो...लवकरच आमिर खानचा (Aamir Khan)  ‘लाल सिंग चड्ढा’ (Laal Singh Chaddha) हा सिनेमा येतोय. या सिनेमासाठी सोनूने एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. हे गाणं का स्वीकारलं? याबद्दलही त्याने स्पष्टीकरण दिलं. सोनू म्हणाला, ‘माझ्यात आणि संगीत दिग्दर्शक प्रीतममध्ये काही कारणांवरून मतभेद निर्माण झाले होते. तरीही ‘लाल सिंग चड्ढा’साठी मी गायलो. कारण आमिरची तशी इच्छा होती. हे गाणं मी गाणार, हा आमिरचा निर्णय होता. त्याच्यासाठी मी हे गाणं गायलं. 

मी भिकारी सिंगर नाही...मी कामासाठी कोणाच्याही मागे धावणार नाही. मी कामासाठी भीक मागत नाही, याचा माझ्या चाहत्यांना अभिमान असायला हवा. सोनू आपल्या समोर राजासारखा फिरतो अन् प्रत्यक्षात कामासाठी भीक मागतो, हे माझ्या चाहत्यांना कळलं तर त्यांना कसं वाटेल. मी काही भिकारी नाही, असंही सोनू या मुलाखतीत म्हणाला. सोनूने 90 च्या दशकात त्याच्या गाण्याच्या करिअरला सुरुवात केली होती. यानंतर त्याने बॉलिवूडमधील सगळ्या मोठ्या कलाकारांसाठी गाणी गायली आहेत. त्याचे अल्बमही प्रचंड गाजले.

टॅग्स :सोनू निगमआमिर खान