Join us

माझ्याशी पंगा घेऊ नकोस, नाहीतर...! सोनू निगमचा भूषण कुमारला थेट इशारा,  वाचा काय म्हणाला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2020 2:23 PM

माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन आणि मी लढेन, असे सोनू या व्हिडीओत म्हणतोय.

ठळक मुद्दे‘लातों के भूत बातों से नहीं मानते...’ अशी सुरूवात करत सोनूने भूषण कुमारची पोलखोल केली आहे.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडचा सिंगर सोनू निगमने बॉलिवूडमधील घराणेशाहीवर प्रहार करत, एक व्हिडीओ पोस्ट केला होता. बॉलिवूडच्या म्युझिक इंडस्ट्रीबद्दलचे काही धक्कादायक खुलासे त्याने केले होते. आज सुशांतने आत्महत्या केली, म्युझिक इंडस्ट्रीतही अशा घटना घडू शकतात, असा इशारा त्याने या व्हिडीओतून दिला होता. म्युझिक इंडस्ट्रीतही काही म्युझिक माफिया आहेत. तेच गायकांचे नशीब घडवतात, बिघडवतात. कोणता सिंगर गाणार,कोणता नाही, हे ते ठरवतात, असे त्याने म्हटले होते. त्याने कोणाचे नाव घेतले नव्हते. पण आता त्याने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्याने टी- सीरिजचा सर्वेसर्वा  भूषण कुमार यांच्यावर टीका केली आहे. केवळ इतकेच नाही तर भूषण कुमारला त्याने थेट इशारा दिला आहे.

‘ तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. पुन्हा माझ्या नादी लागलास तर मरीना कंवरचा व्हिडीओ माझ्या युट्यूब चॅनलवर पब्लिश करेन’, असा  इशारा प्रसिद्ध गायक सोनू निगमने  भूषण कुमारला दिला आहे. सोनूने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे़.

काय म्हणाला सोनू‘लातों के भूत बातों से नहीं मानते...’ अशी सुरूवात करत सोनूने भूषण कुमारची पोलखोल केली आहे.‘मी खूप चांगल्या पद्धतीने बोललो होतो, की तुम्ही नवीन कलाकारांसोबत प्रेमाने वागा, केवळ एवढाच सल्ला मी दिला होता. एखाद्याच्या आत्महत्येनंतर विचार करण्यापेक्षा अशी घटना घडण्यापूर्वी बदललेले केव्हाही चांगले, हे मला सुचवायचे होते. अर्थात   माफिया बदलणारे नाहीत. माफिया माफियाचाच डाव खेळणार. मी कोणाचेच नाव घेतले नव्हते, पण माझे नाव मात्र घेतले जातेय. त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. याच पाच-सहा जणांपैकी एकाच्या भावाने दीड वषार्पूर्वी एक ट्विट केले होते. (व्हिडीओत या ट्विटचा स्क्रिनशॉट दिसत आहे़ स्क्रीनवर गायक अरमान मलिकचे ट्विट दिसतेय,) भूषण कुमार, आता तर मला तुझे नाव घ्यावेच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास.   माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ते दिवस कदाचित तू विसरलास.  भावा माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करून दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करून दे. अबू सालेमपासून मला वाचव, अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती.  आता तू माझ्या नादी लागू नकोस. मरीना कंवर लक्षात आहे ना? ती का बोलली आणि नंतर तिने माघार का घेतली  हे माध्यमांना चांगल्याप्रकारे माहित आहे. तिचा व्हिडीओ माझ्याकडे आहे.  तू माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन आणि मी जबरदस्त लढेन, असे सोनू या व्हिडीओत म्हणतोय.

 

टॅग्स :सोनू निगमभुषण कुमार