सोनू निगमचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म ३० जुलै १९७३ ला फरिदाबाद येथे झाला. सोनू निगमने त्याच्या गायनाच्या करियरची सुरुवात खूपच लहान वयात म्हणजेच केवळ चौथ्या वर्षी केली. त्याने चार वर्षांचा असताना क्या हुआ तेरा वादा हे गाणं त्याचे वडील आगम कुमार निगम यांच्यासोबत स्टेजवर सादर केले होते. त्यानंतर तो नेहमीच वडिलांसोबत स्टेज परफॉर्मन्स देऊ लागला. १८ वर्षांचा असताना सोनू त्याच्या वडिलांसोबत मुंबईत आला आणि उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे त्याने संगीत शिकायला सुरुवात केली. आज सोनू बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध गायकांपैकी एक आहे. त्याला त्याच्या गाण्यांसाठी आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सोनू आज केवळ एक गाणे गाण्यासाठी करोडो रुपये घेतो असे म्हटले जाते. सोनू निगमला करियरच्या सुरुवातीच्या काळात खूपच स्ट्रगल करावा लागला. त्याच्या स्ट्रगलच्या काळातील एक किस्सा चांगलाच गाजला होता. १९४२ अ लव्ह स्टोरी या चित्रपटातील सगळीच गाणी आपल्याला आवडतात. त्यातही एक लडकी को देखा तो ऐसा लगा हे गाणे तर रसिकांचे प्रचंड आवडते आहे. हे गाणे कुमार सानू यांनी गायलेले आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या गाण्यासाठी सोनूचा देखील विचार करण्यात आला होता. आर. डी. बर्मन या चित्रपटाचे संगीतकार होते. एक लडकी को देखा तो ऐसा लगा या गाण्याच्या रेकॉर्डिंगची पूर्ण तयारी झाली होती. आर. डी बर्मन यांच्यासोबत त्यांची संपूर्ण टीम सज्ज होती. पण कुमार सानू स्टुडिओ मध्ये पोहोचले नव्हते. सगळेच त्यांची वाट पाहात होते. खूप वेळ निघून गेला तरी ते आले नाहीत. कुमार सानू पुढच्या काही मिनिटांत आले नाही तर मी हे गाणे सोनू निगमसोबत रेकॉर्ड करणार असे आर डी बर्मन यांनी सगळ्यांना सांगितले. हे ऐकल्यावर विधू विनोद चोप्रा यांना चांगलेच टेन्शन आले होते. सोनूला एक मोठी संधी मिळणार असल्याने कुमार सानू वेळेत येऊ नये अशी प्रार्थना सोनू देखील करत होता. पण काहीच मिनिटांत कुमार सानू आले आणि त्यांनी हे गाणे रेकॉर्ड केले.
या कारणामुळे सोनूचे स्वप्न झाले नाही पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2018 2:55 PM