कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. अनेकांना त्याने त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती. त्याला कोरोनाची लागण झाली असून तो होम क्वारंटाईन आहे.
सोनू सूदने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत लिहिले होते की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ मिळेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत... मी तुमच्यासोबत आहे.
सोनूने लोकांना दिलेला शब्द पाळला आहे. कारण आजारी असताना देखील केवळ 15 मिनिटांत त्याने एका गरजूला रुग्णालयात बेड मिळवून दिला आहे. छोट्या पडद्यावरील दिग्दर्शक अरुण शेषकुमार यांनी ट्वीट करत सोनूकडून मदत मागितली होती. त्यांनी ट्वीट केले होते की, सोनू भाई, उमेश आमच्या कॅमेऱ्यामन टीममधील एक असून त्यांची तब्येत अतिशय खराब आहे. त्यांच्या कुटुंबाला मदतीची गरज आहे. त्यावर सोनूने लगेचच ट्वीट केले आहे की, त्यांना 15 मिनिटांत आयसीयुत बेड मिळेल.... तुम्ही तयारीत राहा... त्यांचे प्राण वाचवूया...
त्यानंतर अरुण यांनी ट्वीट करून काहीच मिनिटांत सांगितले की, त्यांना बेड मिळाला... तुम्ही केलेल्या मदतीसाठी धन्यवाद....