कोरोना काळात सोनू सूदने देवदूत बनून लोकांना प्रचंड मदत केली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्याने अनेकांना त्यांच्या घरी परतण्यासाठी मदत केली होती आणि आता त्याने काहींना ऑक्सिजन सिलेंडर, औषधं, इंजेक्शन्स पाठवले आहेत. सोनू अनेकांना मदत करत असला तरी देशातील लोकांचे दुःख पाहून त्याला प्रचंड वाईट वाटत आहे.
लोक मोठ्या प्रमाणावर मदत मागत आहेत याचा अर्थ सरकार त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्यात असमर्थ ठरत आहे असे त्याचे म्हणणे आहे. त्याने दिल्लीतील कोरोनाच्या परिस्थितीवर नुकतीच ज्येष्ठ पत्रकार बरखा दत्त यांना मुलाखत दिली. त्याने मुलाखतीत सांगितले की, गरीब लोकांचा विचार केला की, मला प्रचंड वाईट वाटते. त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते त्यांच्या जवळच्या व्यक्तींवर उपचार करू शकत नाहीयते... आज माझे आई-वडील जिवंत असते आणि ते कोरोना व्हायरच्या विळख्यात अडकले असते ते मी स्वतःला असमर्थ समजलो असतो.
त्याने पुढे सांगितले, कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन होत आहे. कोरोनामुऴे आई-वडिलांना किंवा त्यांच्यापैकी एकाला जरी लहान मुलाने गमावले असेल तर त्या मुलाला सरकारने मोफत शिक्षण द्यायला पाहिजे. रोज मी लोकांच्या वेगवेगळ्या समस्या ऐकत आहे, त्या ऐकून आपण कोणत्या देशात राहात आहोत असा मला प्रश्न पडत आहे.
सोनू सूदने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि या व्हिडिओद्वारे कोरोनामुळे मृत्यमुखी पडलेल्या लोकांच्या अंतिम संस्कारासाठी सरकारने मदत करावी असे आवाहन केले होते. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांवर एकही पैसा न घेता अंतिम संस्कार करण्यात यावेत. कारण अनेकांकडे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील पैसे नाहीयेत.