कोरोना काळात सोनू सूद (Sonu Sood) निरंतर लोकांची मदत करतोय. दिवसरात्र लोकांसाठी खपतोय. अशावेळी सोनूला एक ‘सुपरवुमन’ भेटली तर? होय, सोनूला अशीच एक ‘सुपरवुमन’ भेटली. अशी तशी नाही तर जगातील सर्वात श्रीमंत ‘सुपरवुमन’. या सुपरवुमनने जे काही केले, ते पाहून सोनूचा ऊर अभिमानाने भरून आला. तिने त्याचे मन जिंकले.ही ‘सुपरवुमन’ कोण, कुठली हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर ती आंध्रप्रदेशच्या एका छोट्याशा गावातील. तिचे नाव बोड्डू नागा लक्ष्मी. ही एक युट्यूबर आहे. या लक्ष्मीने सोनूच्या फाऊंडेशनला (Sood Charity Foundation) 15000 रूपयांचे दान दिले आहे. हे 15000 लक्ष्मीचे पाच महिन्यांचे पेन्शन आहे. आता इतके सगळे ऐकल्यावर ती ‘सुपरवुमन’ कशी? श्रीमंत कशी? असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे. तर त्याचे उत्तर सोनूने त्याच्या ट्विटमध्ये दिले आहे.
सोनूचे ट्विट
बोड्डू नागा लक्ष्मी़ ही एक दिव्यांग मुलगी आणि युटयूबर आहे. ती आंध्रप्रदेशमधील वरीकुंटापाड या छोट्याशा खेड्यात राहते. तिने सूद फाऊंडेशनमध्ये 15,000 रुपयांचा निधी मदत म्हणून दिला आहे. हा पैसा तिच्या 5 महिन्यांच्या पेन्शनचा आहे. ही माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचही दुख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असे नाही. ही एक रियल हिरो आहे, असे ट्विट सोनूने केले आहे.आता लक्षात आलेच असेल़ दृष्टी नसलेल्या दिव्यांग लक्ष्मीने सोनूला मदतीचा हात दिला आहे. हा मदतीचा हात सोनूसाठी लाख मोलाचा म्हणता येईल. जगातील सर्वात श्रीमंत मुलगी सोनूला भेटली, असे म्हणणे म्हणूनच चूक होणार नाही.लक्ष्मीच्या मदतीनंतर सोनूच्या फाऊंडेशनला मदत करण्यास अनेक लोक उत्सुक असल्याचे दिसतेय. देशविदेशातील लोक त्याला मदत कशी पोहोचवू शकतो, याबद्दल विचारणार करत आहेत. सोनूच्या कामात खारीचा वाटा उचलण्यात सर्वच जण उत्सुक आहेत.