पडद्यावर व्हिलनची भूमिका साकारणारा आणि लॉकडाऊन काळातील कामामुळे खरा हिरो ठरलेल्या अभिनेता सोनू सूदचे ट्विट म्हणजे कुणाला तरी मदत किंवा कुणाची तरी वेदना जाणणारे असते. यासाठी सोनूचे मनापासून कौतुकही होते. लोक त्याला डोक्यावर घेतात. पण याच सोनूला आज महाशिवरात्रीच्या दिवशी ट्रोल केले जाऊ लागले. इतकेच नाही तर, #WhoTheHellAreUSonuSood असा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला. हे सर्व कशामुळे तर सोनूच्या एका ट्विटमुळे.
होय, आज महाशिवरात्रीच्या दिवशी सोनूने एक ट्विट केले. ‘शिव भगवान की फोटो फॉरवर्ड करके नहीं किसी की मदद करके महाशिवरात्री मनाएं, ओम नम: शिवाय,’ असे ट्विट सोनूने केले. मात्र त्याचे हे ट्विट वाचून लोक भडकले आणि #WhoTheHellAreUSonuSood या हॅशटॅगसह अनेकांनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.
कृपा करून आम्हाला हिंदूंबद्दल फुकटचे ज्ञान देऊ नकोस, असे एका युजरने लिहिले. काही युजरने सोनूच्या एका जुन्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत त्याला ट्रोल केले. यात त्याने ईदच्या शुभेच्छा दिल्या होत्या. ‘इतके ज्ञान कुठून आणतोस, ते सुद्धा फक्त हिंदू सणांबद्दल. माय फेस्टिवल, माय चॉईस,’ असे एका युजरने लिहिले.
‘तू लॉकडाऊनदरम्यान लोकांची मदत केली, ही चांगली गोष्ट आहे. पण म्हणून हिंदूंनी त्यांचा सण कसा साजरा करावा, हे सांगण्याचा अधिकार तुला मिळत नाही,’ अशा शब्दांत एका युजरने त्याला सुनावले.
अर्थात काहींनी या ट्विटनंतर सोनूला सपोर्टही केला. लॉकडाऊनमध्ये हजारो लोकांच्या मदतीसाठी उभा झालेला हाच एकमेव रिअल हिरो होता, अशा आशयाचे अनेक मॅसेज सोनूच्या चाहत्यांनी केलेत.
सोनू सूद गेल्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या माध्यमातून तो लोकांना मदत करतोय. कधी कोणाचा उपचार करतोय तर कधी मुलांच्या शाळेची फी भरतोय. सोनू सूद आपल्या हाकेला ‘ओ’ देईल, याची लोकांना इतकी खात्री झालीय की लोक लहानमोठ्या समस्या, अडचणी त्याला सांगतात.