प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (sidhu moosewala) यांची रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मानसाच्या जवाहरके गावाजवळ मूसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनंतर त्यांना तातडीने मानसा येथील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कलाविश्वात एकच खळबळ उडाली असून सर्व स्तरांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मूसेवाला यांना आदरांजली अर्पण करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यात अभिनेता सोनू सूदने केलेलं ट्विट अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सोनू सूदने नुकतंच सिद्धू मूसेवाला यांच्याविषयी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने मूसेवाला आणि त्याच्या आईचा एक हासरा फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यावर अनेक जण भावुक झाले असून त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
काय म्हणाला सोनू सूद?
"आणखी एका आईचा मुलगा निघून गेला", असं ट्विट सोनू सूदने केलं. या ट्विटमधून त्याच्या भावना व्यक्त होत असून त्याने अप्रत्यक्षपणे या घटनेचा निषेध केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. परंतु, सुरक्षा काढल्यानंतर लगेच त्यांची हत्या करण्यात आली. विशेष म्हणजे या घटनेनंतर तीन तासांनंतर त्यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर गोल्डी ब्रारने फेसबुक पोस्ट करत स्वीकारली. गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये आहे.
कोण होते सिद्धू मूसेवाला?
मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती.