Join us

“मी असेन किंवा नसेन, गरीब रुग्णांवर मोफत उपचार व्हायला हवेत”; सोनू सूद उभारणार हॉस्पिटल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2021 3:20 PM

अलीकडेच सोनू सूद याच्यावर १८ कोटी कर चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता.

अभिनेता सोनू सूदच्या सहा ठिकाणावर मागील आठवड्यात आयकर विभागानं छापेमारी केली होती. त्यानंतर सोनू सूदकडून चालवण्यात येत असलेल्या फाऊंडेशनच्या निधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. सोनू सूदवर कर चुकवेगिरीचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाचं खंडन सोनू सूदनं केले. आता सोनू सूद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोनूनं आयकर विभागाची कारवाई आणि हैदराबाद इथं हॉस्पिटल उघडण्याच्या योजनेवर भाष्य केले आहे.

सोनू सूद याच्यावर १८ कोटी कर चोरी केल्याचा आरोप लावण्यात आला होता. सोनू सूद म्हणाला की, कुठल्याही फाऊंडेशनकडे त्यांना मिळालेल्या पैशाचा वापर एक वर्षाच्या कालावधीत करण्याची मर्यादा असते. जर फंडचा वापर एक वर्षात नाही झाला तर त्याचा वापर पुढील वर्षी करू शकतात. मी कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या दरम्यान एका फाऊंडेशनची स्थापना केली होती. पहिल्या लाटेवेळी आम्ही प्रवाशांसाठी खूप काम केले. तेव्हा अनेकजण मला मजुरांसाठी बसेस बुक करण्याची ऑफर दिली होती. आम्ही तेव्हा पैसे जमा करत नव्हतो असं त्याने सांगितले.

तसेच मी मागील ४-५ महिन्यांपासून फंड जमा करण्यास सुरुवात केली आहे. नियमांच्या मते, माझ्याकडे या फंडचा वापर करण्यासाठी ७ महिन्याहून अधिक काळ आहे. मी लोकांच्या आणि माझ्या मेहनतीचा पैसा वाया घालवत नाही. मी ज्या ब्रँडमधून कमाई करतो त्यातील २५ टक्के आणि कधी कधी १०० टक्के थेट माझ्या फाऊंडेशनमध्ये जातात. जर ब्रँड पैसे दान करत असेल तर मी त्यांच्या जाहिराती मोफत करतो. फाऊंडेशनच्या फंडमध्ये माझे वैयक्तिक फंड आहेत जे मी दान केले आहेत असं सोनू सूदने सांगितले.

दरम्यान, हैदराबादमध्ये आगामी काळात एक हॉस्पिटल उघडण्याचा मानस आहे. जितके लोक आमच्याकडे मदतीसाठी आले त्यातील बहुतांश जणांवर हैदराबादमध्ये उपचार झालेत. हैदराबादेतील हॉस्पिटलचं तंत्रज्ञान वेगळ्याच उंचीवर आहे.येणाऱ्या ५० वर्षासाठी अशी योजना बनवली जात आहे. ज्यात सोनू सूद असेल किंवा नसेल हे चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत उपचार दिले जातील असं सोनू सूदने सांगितलं.

माझी स्वप्न मोठी...  

माझी स्वप्न मोठी आहेत मी एका मिशनवर आहे. मागील काही दिवसांपासून २ कोटी रुपये हॉस्पिटलच्या प्रकल्पावर खर्च झाले आहेत. याठिकाणी गरजूंना अत्याधुनिक, निशुल्क, बेस्ट क्वालिटीची मेडिकल सुविधा पुरवली जाईल. आम्ही याआधीच एका अनाथालय आणि शाळा यावर काम करत आहे. सर्व प्रकल्प प्रगतीपथावर आहेत असं सोनू सूदनं म्हटलं आहे.

टॅग्स :सोनू सूद