कोरोना महामारीच्या काळात लोकांसाठी ‘देवदूत’ ठरलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) गेल्या आठवड्यांपासून एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. 20 कोटी रूपयांची कर चोरी केल्याप्रकरणी सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. गत आठवड्यात आयकर विभागच्या टीमने त्याची कार्यालये, मालमत्ता आणि निवासस्थानी छापे मारले आणि सर्वत्र खळबळ उडाली. सोनूने यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आता पहिल्यांदा या प्रकरणावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. सोनूने एक लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ‘सख्त राहों में भी आसान सफर लगता है, हर हिंदुस्तानी की दुआओं का असर लगता है,’ अशा ओळी त्याने शेअर केल्या आहेत. सोबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
तो लिहितो, ‘ प्रत्येकवेळी तुम्हाला तुमची बाजू मांडण्याची गरज नसते. कारण काळ सर्व सांगतो. सुदैवाने मी माझ्या पूर्ण शक्तीनिशी आणि मनापासून भारताच्या लोकांची सेवा करू शकलो. माझ्या फाऊंडेशनचा एक एक रूपया अनमोल जीवन वाचवण्यासाठी आणि गरजूंसाठी आहे. अनेक प्रसंगी मी जाहिराती देणाºया ब्रँड्सनाही माझी फी दान देण्यास प्रोत्साहित केले आहे. जेणेकरून पैशांची कमतरता भासू नये. काही पाहुण्यांची आवभगत करण्यात मी काही दिवसांपासून व्यस्त होतो. त्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून तुमच्या सेवेत नव्हतो.परंतु आता पुन्हा तुमच्या सर्वांच्या सेवेसाठी परत आलो आहे.’ कर भला, हो भला, अंत भले का भला... मेरा सफर जारी रहेगा, असे सरतेशेवटी त्याने लिहिले आहे.सोनू व त्याच्या सहका-यांनी 20 कोटी रूपयांची करचोरी केल्याचा आरोप आहे. आयकर विभागाने सोनू व त्याच्याशी संबंधित प्रतिष्ठांनांवर छापेमारी केली तेव्हा, तेव्हा त्याच्या आर्थिक व्यवहारात अनियमितता आढळून आल्याचाही दावा केला जातोय. आरोपानुसार, सोनूच्या चॅरिटी फाउंडेशनने यावर्षी एप्रिल महिन्यापर्यंत 18 कोटींपेक्षा जास्त देणगी गोळा केली होती. त्यापैकी 1.9कोटी रुपये त्याने लोकांची मदत करण्यासाठी खर्च केले आणि उर्वरित 17 कोटी रुपये त्याच्या बँक खात्यात आहेत.सोनू सूदने बेहिशेबी पैसा बनावट संस्थांच्या माध्यमातून बोगस कर्जाद्वारे पैसे वळविल्याचे आढळले आहे. तसेच एफसीआरए कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.