मागील काही दिवसापासून हिंदी बॉक्स ऑफिसवर साऊथचे चित्रपट बक्कळ कमाई करत थेट हिंदी चित्रपटांनाच आव्हान देत आहेत. अलीकडच्या काळातील पुष्पा, आरआरआर आणि केजीएफ २ या चित्रपटांच्या हिंदी डब वर्जन्सनेही चांगली कमाई केली. अशातच कन्नड फिल्मस्टार किच्चा सुदीपने हिंदी ही राष्ट्रभाषा नसल्याचे वक्तव्य करत एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत अजय देवगणने किच्चाला सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, आता या वादात अभिनेता सोनू सूदनंही उडी घेतली आहे.
सोनू सूद हिंदी चित्रपटांशिवाय दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही अभिनय साकारतो. “हिंदीला केवळ राष्ट्रीय भाषा म्हटलं जाईल असं मला वाटत नाही. भारताची एकच भाषा आहे आणि ती म्हणजे एन्टरटेन्मेंट. तुम्ही कोणत्या इंटस्ट्रीमधून येता याचा काहीही फरक पडत नाही. जर तुम्ही लोकांचं मनोरंजन केलं तर ते तुम्हाला प्रेम करणार, तुमचा सन्मान करणार, तुमचा स्वीकार करतील,” असं सोनू सूद म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यानं यावर भाष्य केलं.
यावेळी सोनू सूदनं दाक्षिणात्य चित्रपटांवरही भाष्य केलं. “दक्षिणेतील चित्रपट हिंदी चित्रपट तयार करण्याची पद्धत बदलतील. चित्रपट निर्मात्यांना आता प्रेक्षकांची सेन्सिबलीटी समजण्याची गरज आहे. डोकं बाजूला ठेवून चित्रपट पाहा असं सांगत होतो तो काळ आता लोटला आहे. लोक आता आपलं डोकंही बाजूला ठेवत नाहीत आणि सामान्य चित्रपटासाठी हजारो रूपयेही खर्च करत नाही. केवळ चांगल्याच चित्रपटांना ते स्वीकारतात,” असंही तो म्हणाला.
काय आहे प्रकरण?दक्षिणात्य चित्रपटांना मिळत असलेल्या नेत्रदीपक यशाबाबत बोलताना हिंदी आता राष्ट्रभाषा नसल्याचे किच्चा म्हणाला होता. किच्चाच्या याच वक्तव्यावर अजयने ट्विट करत आपले मत व्यक्त केले. किच्चा सुदीप, माझ्या भावा तुझ्या म्हणण्यानुसार जर हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही, तर मग तू आपल्या मातृभाषेतील चित्रपट हिंदी भाषेत डब करून का रिलीज करतोस? हिंदी आपली मातृभाषा आणि राष्ट्रभाषा होती, आहे आणि कायम राहील.