कोरोनामुळे देशभर दहशतीचे, भीतीचे वातावरण आहे. दिवसेंदिवस स्थिती बिघडताना दिसतेय. रूग्णालयाबाहेरचा रूग्णांच्या नातेवाइकांचा आक्रोश मन हेलावणारा आहे. बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) यावेळीही लोकांच्या मदतीसाठी कंबर कसली आहे. सोनूला स्वत:ला कोरोनाची लागण झाली आहे. पण अशाही स्थिती लोकांना तो शक्य ती मदत करताना दिसतोय. स्वत: कोरोनाने ग्रस्त असलेल्या सोनूला लोकांची व्यथा, त्यांच्या अडचणी चांगल्याच कळल्या आहेत. कोरोनामुळे पुन्हा एकदा लोकांच्या जगण्यावर मर्यादा आल्या आहेत. अशात तासन् तास दिवसरात्र टीव्ही पाहण्याशिवाय अनेक लोकांजवळ पर्याय नाहीत. पण टीव्हीवरच्या कोरोनाच्या बातम्या, ब्रेकिंग न्यूजचा भडीमार लोकांच्या चिंतेत भर घालतोय. अशात सोनू सूदने लोकांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. सोनूने ट्विट करत देशातील जनतेला कळकळीचे आवाहन केले आहे.
टीव्ही रिमोट सोडा, देश जोडा. दुस-यांचा जीव वाचवाल, तेव्हा तर जगू शकाल, असे त्याने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.याआधी सोनूने पुन्हा आपल्या गावाकडे निघालेल्या मजुरांबद्दल चिंता व्यक्त केली होती.
सोनू सूदने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर करत लिहिले होते की, नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझी कोव्हिड १९ टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे मी स्वतःला क्वारंटाइन केले आहे. काळजी करण्याची गोष्ट नाही. उलट, तुमच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी माझ्याकडे आता आधीपेक्षा जास्त वेळ मिळेल. लक्षात ठेवा, कोणत्याही अडचणीत... मी तुमच्यासोबत आहे.