चित्रपटात खलनायक असलेला सोनू सूद लॉकडाऊन कालावधीत केलेल्या कार्यामुळे रियल लाईफमध्ये नायक बनला आहे. आपल्या मदतीच्या कृतीने कोट्यवधी भारतीयांची मने सोनूने जिंकली आहेत. सोनू सूदच्या या कामाची दखल सर्वच स्तरातून घेण्यात येत आहे.अगदी गावात पोहोचलेल्या मजुरांपासून ते केंद्रीयमंत्र्यांपर्यंत सर्वचजण सोनूच्या कामाचं कौतुक करत आहेत.
कुणी चित्र काढून, कुणी व्हिडिओ बनवून, कुणी कविता लिहून, कुणी गाणं म्हणून सोनुचे आभार मानत आहेत. मात्र, एका चाहत्याने, सोनूच्या माध्यमातून आपल्या गावी पोहोचलेल्या तरुणाने चक्क देवघरातील देव्हाऱ्यात सोनूला स्थान दिलं आहे. या तरुणाने देव्हाऱ्यातील साईबाबांच्या मुर्तीजवळ सोनूचा फोटो ठेवत, त्याची आरती केली आहे. या युवकाने आरतीचा हा व्हिडिओ ट्विटरवरुन शेअर केला आहे.
अनेकांसाठी मसीहा बनलेला सोनू सूदने आता ७० वर्षाच्या लिलावती आजीलादेखील मदतीचा हात दिला आहे. लिलावती केदारनाथ दुबे असे या आजीबाईंचे नाव आहे.लॉकडाऊनमध्ये मुलगा तिची काळजी घेईल. मुलासह आईला राहता येईल या आशेने लिलावती आजी मुबंईत मुलाकडे राहायला आल्या होत्या. पण मुलाने कसलीही तमा न बाळगात आईलाच घरातून हाकलून लावले. म्हातारपणी मुलांचा तो आधार. पण त्याच मुलाने आईला घरातून बाहेर काढून टाकल्यावर लिलावती यांचे दुःख त्या कोणाला सांगणार.
अशात त्यांनी पुन्हा त्यांच्या घरी दिल्लीला जायचे ठरवले. त्यासाठी मुंबईचे रेल्वेस्थानक गाठण्यासाठी तब्बल १३ किमी चालत रेल्वेस्थानकावर त्या पोहचल्या. लिलावती आजींना कसे जायचे? कुठे जायचे ?काहीही माहिती नव्हते. लीलावती यांच्या म्हणण्यानुसार त्याचा दुसरा मुलगा दिल्लीत राहतो, परंतु तो देखील त्यांना घरी ठेवण्यास नकार देऊ शकतो. अशा परिस्थितीत, जगण्यासाठी भीक मागून दिवस काढेन असे आजींनी सांगितले. मात्र या आजीबाईंची व्य़था सोनू सोदूला कळताच त्याने लिलावती यांना आधार द्यायचे ठरवले आहे.