Join us

100 करोडी सिनेमापेक्षा यात लाखपट मोठं समाधान... ! हे ट्विट वाचून तुम्हालाही वाटेल सोनू सूदचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 2:58 PM

सोनू सूद (Sonu Sood ) इतक्या लोकांची मदत कशी करू शकतो? कुठून येते इतकी ऊर्जा? असे प्रश्न कदाचित तुम्हालाही पडले असतील  तर...

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती.

पुन्हा एकदा कोरोनाचा जोर वाढला आहे आणि अभिनेता सोनू सूद (Sonu Sood ) पुन्हा एकदा कोरोना रूग्णांच्या, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर दिसतोय. कोरोनामुळे हवालदिल झालेल्यांसाठी सोनू अहोरात्र झटतोय. ऑक्सिजन पुरवण्यापासून तर रूग्णांना रूग्णालयात आयसीयू बेड, रेमडिसिवीर औषधी उपलब्ध करून देण्यापर्यंत शक्य असेल ते सर्व सोनू करतोय. लोकांचा जीव वाचावा, यासाठी त्याची निरंतर धडपड सुरु आहे. सोनू इतक्या लोकांची मदत कशी करू शकतो? त्याला कुठून इतकी प्रेरणा मिळते? कुठून तो इतकी ऊर्जा आणतो? असे प्रश्न कदाचित तुम्हालाही पडले असतील. तर आता सोनू सूदने खुद्द याचे उत्तर दिले आहे. सोनूने ट्विट करत, याबद्दल लिहिले. (Sonu Sood tweet)

तो लिहितो,

अर्ध्यारात्री मला लोकांचे मदतीसाठी फोन येत आहेत. काही गरजू रूग्णांना बेड मिळवून देऊन, काहींना ऑक्सिजनची मदत करून  लोकांचे जीव वाचत असतील तर यापेक्षा मोठे समाधान नाही. शपथेवर सांगतो, 100 करोडी सिनेमाचा भाग बनण्यापेक्षा यातून मिळणारे समाधान लाखपटींनी मोठे आहे. लोक रूग्णालयाबाहेर बेडसाठी ताटकळत असताना आपण शांतपणे झोपू शकत नाही़..., असे त्याने ट्विटमध्ये लिहिले आहे.

काही दिवसांपूर्वीच सोनू सूदला कोरोनाची लागण झाली होती. पण स्वत: कोरोना पॉझिटीव्ह असूनही त्याची मदत थांबली नव्हती. आता सोनू कोरोनामुक्त झाला आहे आणि पुन्हा एकदा लोकांच्या मदतीसाठी सज्ज झाला आहे. आता त्याने एक पाऊल पुढे टाकत सर्वसामान्यांची मोफत कोरोना चाचणी करून देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही आता आराम करा आणि टेस्टचे माझ्यावर सोपवा, असे लिहित त्याने कोरोना रूग्णांसाठी ही नवी सुविधा सुरु केली आहे.  

टॅग्स :सोनू सूद