कोरोना काळात अनेकांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद पुन्हा एकदा दिवसरात्र लोकांची मदत करतोय. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या कानाकोप-यातील गरजूंना मदत करतोय. सध्या देशात ऑक्सिजनचा, रूग्णालयातील बेड्सचा प्रचंड तुटवडा भासतोय. रूग्णाला बेड मिळावा, ऑक्सिजन मिळावा म्हणून नातेवाईक हवालदिल होऊन फिरत आहेत. देशभरात हेच चित्र आहे. सोनू सूदलाही (Sonu Sood) गरजू रूग्णांसाठी बेड मिळून देण्यासाठी अनेक तास खर्ची घालावे लागत आहेत. एका ट्विटद्वारे त्याने दिल्ली व उत्तर प्रदेशातील स्थिती सांगितली आहे.
‘दिल्लीत बेडची व्यवस्था करण्यासाठी मला 11 तास लागलेत आणि उत्तर प्रदेशात एक बेड उपलब्ध करून देण्यासाठी साडे नऊ तास लागलेत़ पण तरिही आम्ही करून दाखवू,’ असे ट्विट सोनूने केले.याआधी एका ट्विटमध्ये सोनूने दिल्लीतील कोरोना रूग्णांच्या स्थितीबद्दल निराशा व्यक्त केली होती.
‘दिल्लीत देवाला शोधणे सोपे आहे, पण रूग्णालयात बेड मिळवणे कठीण. पण शोधूच.. फक्त हिंमत सोडू नका,’ असे ट्विट त्याने केले होते.
चीनवर आरोप!!
आम्ही शेकडो ऑक्सिजन कंसंट्रेटर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. पण चीनने आमच्या अनेक कन्साइन्मेंट्स रोखून धरल्या आहेत, हे दु:खद आहे. या कन्साइन्मेंट्स त्वरित क्लिअर करा. लोकांचा जीव वाचवण्यासाठी आमची मदत करा, असे ट्विट करत सोनूने भारतातील चीनी दूतावासाला टॅग केले. त्याच्या या ट्विला चीनी राजदूताने लगेच उत्तर दिले. कोरोनाविरूद्धच्या या लढ्यात चीन भारताची पूर्ण मदत करण्यास कटिबद्ध आहे. माझ्या माहितीप्रमाणे सर्व मालवाहतूक मार्ग सामान्य आहेत, असे त्यांनी लिहिले़